काँग्रेसमध्ये महिला कार्यकर्त्या कशा येणार?
#नवी दिल्ली
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेच महिला पदाधिकाऱ्यांशी असभ्य वर्तन करणार असतील, त्यांची छळवणूक करणार असतील आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी याकडे डोळेझाक करत असतील तर काँग्रेसमध्ये महिला कार्यकर्त्या कशा येतील, असा सवाल आसाम युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. व सचिव वर्धन यादव यांनी छळवणूक व असभ्य वर्तन केल्याची तक्रार करूनही राहुल गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत दत्ता यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. दरम्यान महिला आयोगाने श्रीनिवास यांच्या चौकशीचे आदेश बजावले आहेत.
आसाम युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. व सचिव वर्धन यादव यांच्यावर छळवणूक आणि असभ्य वर्तन केल्याचे आरोप केले होते. तसेच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही यावर अद्याप साधी चौकशी समितीही नेमण्यात आली नसल्याचे दत्ता यांनी सांगितले. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाने आसामच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एक निवेदन जारी करत महिला आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. डॉ. अंकिता दत्ता यांचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. दत्ता यांनी याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना माहिती दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आसामच्या पोलीस महासंचालकांनी या घटनेची सविस्तर, निष्पक्ष चौकशी करावी. तसेच याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिले आहेत.
वृत्तसंस्था