कसा देणार वेदनाविरहित मृत्यू
#नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी शिक्षा असते ती फाशीची. फाशीऐवजी मरेपर्यंत म्हणजेच आजीवन कारावासाचीही शिक्षा सुनावली जाते. मात्र गंभीर गुन्ह्यांसाठी भारतीय न्यायव्यवस्थेने दिलेली सर्वाधिक मोठी शिक्षा फाशीची अथवा मृत्युदंडाची असते. फाशीची शिक्षा देताना संबंधित व्यक्तीला किमान वेदना व्हाव्यात, यासाठी प्रागतिक देशात वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतातही फाशी देताना संबंधिताला किमान वेदना व्हाव्यात, असे पर्याय शोधले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने असे पर्याय धुंडाळण्यासाठी तज्ज्ञांचे एक मंडळ स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आढावा घेण्याची सूचना केली आहे.
मृत्युदंड देण्यासाठी फाशीसारखा वेदनादायी मार्ग अवलंबण्याऐवजी अन्य मार्ग वापरले जावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही याचिका सुनावणीस घेतली. याचिकाकर्त्याने फाशी हा मृत्युदंड देण्याचा वेदनादायी प्रकार असल्याचे सांगत अन्य पर्यायांचा वापर करण्याची विनंती केली आहे. फास लावून मारण्यात वेदना होतात. त्यापेक्षा इंजेक्शन देऊन, गोळी घालून अथवा विजेचे झटके देऊन जीव घेण्यात यावा, असे पर्याय सुचवले आहेत.
फाशी देताना संबंधिताला किती वेदना होतात? मृत्युदंड देण्यासाठी फाशी हा सर्वात वेदनादायक प्रकार आहे का ? हे तपासले जाईल. त्यावर आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानविषयक दृष्टीने विचार केला जाईल. मानवी मूल्य आणि स्वीकारार्हता या दोन निकषांचा विचार करून अन्य काही पर्याय स्वीकारता येतील, असे निरीक्षण सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदवले. फाशी देताना संबंधित व्यक्तीला नेमक्या किती वेदना होतात. जेव्हा न्यायालये मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात, तेव्हा या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा न्याय दंडाधिकारी आणि कारागृह अधीक्षकांच्या समोर केली जाते. त्यामुळे आपल्याकडे याबाबतची ठोस अशी माहिती नक्कीच असू शकते, असेही चंद्रचूड म्हणाले. याच खंडपीठातील न्यायमूर्ती नरसिम्हा यांनी, आपण आजच या संदर्भात निर्वाळा देणार नसल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात येत्या २ मे रोजी पुढील सुनावणी घेण्यात येईल. मात्र तोवर केंद्र सरकारने याबाबतचे पर्याय शोधावेत. राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे प्रतिनिधी या मंडळावर घेता येतील, याशिवाय वैद्यकीय शास्त्रज्ञांची अथवा अन्य विशेषज्ञांची मदत आपल्याला घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वृत्तसंस्था