इतिहासातील सर्वोच्च तप्त एप्रिल
#नवी दिल्ली
भारतासह दक्षिण चीन आणि थायलंडपर्यंत उष्णतेची लाट आली आहे. या वर्षीचा एप्रिल महिना आजवरील सर्वोच्च तापलेला एप्रिल ठरला आहे. हवामानशास्त्र अभ्यासकांच्या मते येत्या काळात अधिक प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.
भारतात प्रयागराजचे तापमान या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (१७ एप्रिल) ४४.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, तर राजधानी दिल्लीत मंगळवारी (१८ एप्रिल) ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेची लाट किमान शुक्रवारपर्यंत (२१ एप्रिल) कायम राहण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामानतज्ज्ञ आणि हवामान इतिहासकार मॅक्सिमिलियानो हेरेरा यांनी या असामान्य उच्च तापमानाचे वर्णन 'एप्रिलच्या इतिहासातील सर्वात वाईट उष्णतेची लाट' असे केले आहे. येत्या काही दिवसांत यापेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे. उत्तर आणि पूर्व भारतातील सहा शहरांमध्ये मंगळवारी (१८ एप्रिल) ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. भारतासोबतच बांगलादेशातही सरासरी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ या दोन संकटांचे परिणाम ज्या देशात दिसून येत आहेत, त्यात बांगलादेश आघाडीवर आहे. ढाक्का येथे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले आहे. १५ एप्रिल रोजी ढाक्का शहरात ५८ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आठवड्याच्या शेवटी थायलंडमध्ये इतिहासात प्रथमच तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
वृत्तसंस्था