गृहमंत्री अमित शाह विरोधकांवर बरसले
#नवी दिल्ली
मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (दि. ९) लोकसभेत विरोधकांवर खरपूस टीका केली. जनतेची दिशाभूल करण्यासाठीच हा अविश्वास ठराव आणल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
‘‘अल्पसंख्याकांचा मुद्दाच नाही. देशातील ६० कोटी गरीब जनतेला नवी आशा कोणी दिली असेल तर ती मोदी सरकारने दिली आहे. मी देशभर फिरतो, लोकांमध्ये जातो. अनेक ठिकाणांहून जनतेशी संवाद साधला. कुठेही अविश्वासाची धुसर शक्यताही नाही. स्वातंत्र्यानंतर मोदी हे देशाला लाभलेले सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान आहेत,’’ असे शाह म्हणाले.
‘‘मी संपूर्ण देशातील जनतेला सांगू इच्छितो की, स्वातंत्र्यानंतर जनतेचा कोणत्याही एका सरकारवर विश्वास असेल तर ते मोदी सरकार आहे. एनडीए दोनदा दोन तृतीयांश बहुमताने निवडून आले. भाजप दोनदा पूर्ण बहुमताने निवडून आला. ३० वर्षांनंतर प्रथमच पूर्ण बहुमताचे सरकार देण्याचे काम आम्ही केले. हे पंतप्रधान असे आहेत की, ते स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. एकही रजा न घेता दिवसाचे १७ तास जास्तीत जास्त काम करणारा स्वातंत्र्यानंतर कोणता पंतप्रधान असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. स्वातंत्र्यानंतर जास्तीत जास्त किलोमीटर आणि जास्तीत जास्त दिवसांचा प्रवास करणारा कोणी पंतप्रधान असतील तर ते नरेंद्र मोदीच आहेत. सरकार वर्षानुवर्षे चालते तेव्हा दोन-चारच निर्णय घेतले जातात, जे युगानुयुगे स्मरणात राहतात. मोदी सरकारच्या ९ वर्षांत असे किमान ५० निर्णय झाले आहेत जे युगप्रवर्तक आहेत,’’ असे सांगत शाह यांनी विरोधकांनी केवळ जनतेची दिलाभूल करण्यासाठी हा अविश्वास ठराव आणल्याचा आरोप केला.
मोदी पंतप्रधान होईपर्यंत नऊ कोटी महिलांच्या घरात धूर होता. आम्ही सिलिंडर पाठवला, त्यानंतर त्यांचे घर धूरमुक्त झाले. अनेक देशांची लोकसंख्या ११ कोटींच्या निम्मीही नाही. ११ कोटी कुटुंबांकडे शौचालय नव्हते. यूपीए-काँग्रेसला ५५ वर्षे त्यांची वेदना कळली नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे ते नेहमी सांगतात. कोणाचे कर्ज माफ करण्यावर आमचा विश्वास नाही, त्याला कर्ज घ्यावेच लागणार नाही, अशी व्यवस्था आम्ही करतो. १४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख ४० हजार कोटींहून अधिक रक्कम जात आहे. एकीकडे ७० हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा लॉलीपॉप आहे, तर दुसरीकडे आमच्या मानधनाची रक्कम आहे. रेवडी नाही. आम्ही एक सर्वेक्ष ण केले. ज्याच्याकडे अडीच एकरपेक्षा कमी जमीन आहे, त्याला शेतीत किती खर्च येतो, त्यानुसार मोदींनी सहा हजार रुपये दिले. तुम्ही एकदा शेतकऱ्याला कर्जमुक्त केले. मोदींनी आयुष्यभरासाठी शेतकरी कर्जमुक्त करण्याचे काम केले आहे. कोणी आजारी पडले तर संपूर्ण कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली गाडले जायचे. मोदीजींनी ५० कोटी नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले आहेत, असे सांगत शाह यांनी मोदींनी राबविलेल्या योजनांचा उल्लेख केला.
‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’ ला
मोदींची प्राथमिकता
शाह म्हणाले, ‘‘१९४२ रोजी आजच्याच दिवशी गांधीजींनी ब्रिटिशांविरोधात ‘भारत छोडो’ चा नारा दिला होता. साडेनऊ वर्षांत मोदीजींनी एका नव्या प्रकारचे राजकीय युग सुरू केले. तीस वर्षे राजकारण भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरणाने ग्रासले होते. मोदींनी ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’ ला प्राथमिकता देत भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरणाविरोधात मोहीम राबवली, पण तरीही भ्रष्टाचार दूरवर बसला आहे. कुटुंबवाद दिसतोय आणि तुष्टीकरणाचे राजकारण दिसत आहे. म्हणूनच मोदीजींनी आज तिघांनाही भारत सोडण्याचा नारा दिला आहे.’’वृत्तसंस्था