तुमच्याकडून उच्च नैतिकतेची अपेक्षा होती
#सुरत
राहुल गांधी हे कोणी सर्वसामान्य व्यक्ती नाहीत. त्यांनी हे विधान केले त्यावेळी ते विद्यमान खासदार होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही शब्दाचा जनमानसावर मोठा प्रभाव पडू शकतो. राहुल गांधींसारख्या व्यक्तींकडून उच्च नैतिकता अपेक्षित असल्याचे सांगत गुरुवारी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहेत. तसेच त्यांनी शिक्षेविरुद्ध दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर होते. कोलार येथील एक सभेत बोलताना ‘सर्व चोरांची आडनावं मोदी कशी काय असतात?’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. या वक्तव्यावरून भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करत राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान केल्याचे म्हटले होते. हे प्रकरण सत्र न्यायालयात गेल्यानंतर या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर संसदेनेही त्यांच्यावर त्वरित कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. यामुळे या शिक्षेवर स्थगिती मिळावी याकरिता राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु, सुरत न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे.
राहुल गांधी यांना खडे बोल सुनावताना न्यायाधीश रोबिन मोगेरा यांनी, राहुल गांधी यांच्या तोंडून निघालेले शब्द हे कोणत्याही व्यक्तीला मानसिक त्रास देणारेच आहेत. मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांच्या भावना दुखावल्या असतील, असे निरीक्षण यांनी नोंदवले आहे.
वृत्तसंस्था