अंधश्रद्धेतून तो बनला ब्लेडमॅन
#लखनौ
अंधश्रद्धेतून कोण काय करेल याचा भरवसा देता येत नाही. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीनेही पत्नीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी चार महिलांवर ब्लेडने हल्ला केला आहे. या दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. तिसऱ्या पत्नीच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी मौलवीने मला हा सल्ला दिला असल्याचे सज्जाद हल्लेखोरांचे म्हणणे आहे.
सज्जादने आतापर्यंत चार महिलांवर ब्लेडने हल्ला केलेला आहे. सज्जाद हा उत्तर प्रदेशच्या बरेलीचा रहिवासी आहे. त्याने चौथा हल्ला केला आणि पकडला गेला. पोलिसांनी सज्जादला अटक केली असून त्याने महिलांवर ब्लेडने हल्ला करण्यामागचे नेमके कारण सांगितले आहे. सज्जादची दोन लग्न झाली होती. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची फरा नावाच्या एका २५ वर्षीय तरुणीशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. ती कुतूबखाना येथे कामाला होती. त्यानंतर दोघांनी लग्न करत बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही दिवसांनंतर फराने सज्जाद विरोधात खोटी पोलीस तक्रार केली. तसेच त्याच्याकडून २० लाख रुपये उकळले.
या घटनेनंतर सज्जादला महिलांचा राग येऊ लागला. तसेच त्याच्यावर झालेल्या पोलीस केसनंतर कोर्टाच्या चकरा मारून त्याला वैताग आला होता. त्याला या प्रकरणातून स्वत:ची सुटका करून घ्यायची होती. एक दिवस त्याची ओळख बरेली पोलीस ठाण्याजवळ असलेल्या एका मौलवीशी झाली. त्याने ही व्यथा मौलवीसमोर मांडली. त्यानंतर मौलवीने त्याला या कोर्टकचेरीतून आणि पत्नीपासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी चार महिलांवर ब्लेडने हल्ला करण्यास सांगितले. मौलवीच्या सांगण्यावरून त्याने कुतूबखाना परिसरात काम करणाऱ्या चार महिलांवर ब्लेडने हल्ला केला. तो गाडीने यायचा आणि महिलांवर ब्लेडने हल्ला करून तिथून पळून जायाचा. दरम्यान, पोलिसांनी सज्जादला अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही मौलवीचादेखील शोध घेत असल्याचे बरेलीचे पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था