संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने 'बटेंगे तो कटेंगे' असा सूचक इशारा मतदारांना दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य असून महाराष्ट्रातही त्याचा वापर केला जात आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या टिकेवरून निर्माण झालेला वाद आता वाढत चालला आहे. योगी आदित्यनाथांवरील टीकेवरून आता काँग्रेसचे माजी नेते कल्की पीठाधेश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी खर्गे यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे.
मल्लिकार्जून खर्गे यांनी योगी आदित्यनाथांवर नागपूर येथील रॅलीत टीका केली होती. बटेंगे तो कटेंगेचा नारा समाजात पूट पाडणारा आहे, असे खर्गे म्हणाले होते. तसेच, झारखंड येथील रॅलीत खर्गे म्हणाले होते की, खरा योगी बटेंगे तो कटेंगेसारखी भाषा करत नाही. अशी भाषा दहशतवाद्यांकडून वापरली जाते. योगी आदित्यनाथ हे मठाचे अध्यक्ष आहेत. भगवी वस्त्र परिधान करतात. पण त्यांचा स्वभाव 'मुख मे राम और बगल मे छुरी'सारखा आहे.
ज्यांना अखंड देश हवा असतो त्यांनी अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत, अशी टीका खर्गे यांनी केली. खर्गे यांच्या या वक्तव्यावर प्रमोद आचार्य म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाप्रमाणे ते तर हिंदू वाटतात. पण त्यांची कृती तशी वाटत नाही. त्यांच्या वक्तव्यातून सनातन धर्माविषयी द्वेष दिसतोय. सनातन धर्म आणि संतांविषयी ज्यांच्या मनात राग असतो त्यांना भारतीय राजकारणात स्थान नाही. खर्गे यांनी सनातन धर्म, हिंदू संतांचा आणि भगव्या वस्त्राचा अपमान करणे थांबवावे. खरे हिंदू कधीच आपल्या धर्मातील व्यक्तींचा अनादर करत नाहीत, असा समाचार आचार्यांनी घेतला आहे.
मग काय गुंडांनी राज्य करायचे का?
दरम्यान, जगदगुरू रामभद्राचार्यांनी खर्गेंच्या विधानावर परखड टीका केली आहे. असे कुठे म्हटले आहे की भगवी वस्त्रे परिधान करणाऱ्यांनी राजकारणात येऊ नये? मग काय गुंडांनी राजकारणात यावे का? भगवाधारींनी (भगवी वस्त्रे परिधान करणाऱ्यांनी) राजकारण करायला हवे. भगवा रंग हा इश्वराचा रंग आहे. हाच भगवा ध्वज फडकावून छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र केले होते.
भगवाधारीनेच राजकारण करायला हवे. सूट-बूट घालणाऱ्यांनी भारतात राजकारण करता कामा नये, अशा शब्दांत रामभद्राचार्यांनी खर्गेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. दरम्यान, यावेळी रामभद्राचार्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या ‘कटेंगे तो बटेंगे’ या घोषणेचे समर्थनही केले. हे खरे आहे. आपल्यात फूट पडता कामा नये. पंथ जरी अनेक असले, तरी हिंदुंनी मात्र एक व्हावे. जर आपण एक असू, तर कुणीही आपल्याला काहीही करू शकणार नाही. एक बोट कमकुवत असते. पण पाच बोटांची मूठ शक्तिशाली असते, असेही रामभद्राचार्य म्हणाले.