घे भरारी, उंच आकाशी; चांद्रयान ३ ची अवकाशात ऐतिहासिक झेप !
भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या 'बाहुबली रॉकेट' म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.
भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
चांद्रयान-3 अंतराळयान २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-3 ने ४० दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल. ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडले तर, चांद्रयान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.