गहलोत सरकारला हिंदुत्त्वाचा कळवळा
#जयपूर
राजस्थानमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत हे सचिन पायलट यांचे बंड शमविण्यात व्यस्त आहेत. मात्र त्याबरोबरच त्यांना आगामी निवडणुकीतील काँग्रेसच्या यशासाठीही धडपड करावी लागत आहे. या धडपडीचा भाग म्हणून त्यांच्या सरकारने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. हिंदूंची मंदिरे आणि सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी कार्यरत संस्थांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
केवळ राजस्थानच नव्हे देशभरात काँग्रेसची प्रतिमा हिंदूविरोधी बनली आहे. त्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला ही प्रतिमा पुसावी लागते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी २०१७ साली गुजरात विधानसभा निवडणुकीत मंदिरांना भेटी देत काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न अपुरा ठरला. आता राजस्थानात अशोक गहलोत सरकार हिंदूंना गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीला अवघे एक वर्ष राहिले आहे. गहलोत सरकार वेद विद्यालयांना मदत करून भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राजस्थानसारख्या राज्यात काँग्रेसने हिंदुत्वाचा मुद्दा उचलणे स्वाभाविक आहे. या राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष खूप आहे. त्यातून पायलट यांच्याशी दोन हात करायचे असतील तर गहलोत यांना हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणे अनिवार्य बनले आहे.
संस्कृत शिक्षणावर देणार भर
हिंदूंच्या मतांसाठी गहलोत सरकार संस्कृत शिक्षण देण्यावरही भर देत आहे. राज्य सरकारने १६ संस्कृत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तसेच १०० कोटींचे पॅकेज देऊन मंदिरांचा विकास करण्याची घोषणा केली आहे. भाजपने स्वतःला हिंदुत्वाचे ‘ठेकेदार’ असल्याचे लोकांच्या मनावर रुजवले आहे. भाजपची ही प्रतिमा बाजूला सावरून काँग्रेसला आपली स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनेदेखील हीच रणनीती अवलंबली आहे.
वृत्तसंस्था