अवघ्या २० रुपयांत पोटभर जेवण
#नवी दिल्ली
देशभरातील रेल्वे प्रवाशांना आता अवघ्या २० रुपयांत पोटभर खायला मिळणार आहे. रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी माफक दरात पोटभर जेवण दिले जाणार आहे. देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर ही नवी योजना सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. मात्र, त्याआधी काही ठिकाणी केवळ चाचणी म्हणून ही योजना राबवण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकांवर जनरल डब्बे ज्या ठिकाणी थांबणार त्याच ठिकाणी हे स्टॉल्स उभारले जातील. प्रवाशांना रेल्वेतून उतरुन फारसे लांब जावे लागू नये अशीच व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, सर्वात आधी चाचणी म्हणूनच ही योजना राबवली जाणार आहे.
६४ स्थानकांवर स्वस्त जेवण
स्वस्त दरांत जेवण उपलब्ध करुन देण्याची योजना सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेने ६४ रेल्वे स्थानकांची निवड केली आहे. सर्वात आधी या ६४ रेल्वे स्थानकांवर सहा महिन्यांसाठी ही सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर ही सेवा इतर रेल्वे स्थानकांवर सुरू केली जाईल. पूर्व विभागातील 29 स्थानक, उत्तर विभागातील १० स्थानक, दक्षिण मध्य विभागातील ३ स्थानक, दक्षिण विभागातील ९ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे, जिथे स्वस्त जेवण मिळेल.
वृत्तसंस्था