‘कालिकत’चे माजी कुलगुरूही लोकसभेच्या आखाड्यात
#नवी दिल्ली
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून केरळमधील मलप्पुरम मतदारसंघातून अब्दुल सलाम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अब्दुल सलाम हे कालिकत विद्यापीठाचे कुलगुरूही राहिले आहेत. भाजपच्या १९५ उमेदवारांच्या यादीत अब्दुल सलाम हे एकमेव मुस्लीम उमेदवार आहेत.
मुस्लिमबहुल मलप्पुरम जागेवर त्यांचा सामना इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (आययुएमएल) ई. टी. मुहम्मद बशीर आणि भारतीय मार्क्सवादी पक्षाचे (भाकप एम) व्ही. वासीफ यांच्याशी होईल. या जागेवर भाजपचे उमेदवार अब्दुल सलाम दीर्घकाळापासून भाजपचा प्रचार करत असल्याने ही लढत रंजक ठरणार असल्याचे मानले जात आहे. भाजपचे एकमेव मुस्लिम उमेदवार अब्दुल सलाम हे प्रतिष्ठित कृषी शास्त्रज्ञ आहेत आणि २०१९ पासून भाजपशी संबंधित आहेत. अब्दुल सलाम यांनी उमेदवारी दिल्यावर सांगितले की, भाजपच्या पहिल्या यादीत समाविष्ट असलेला एकमेव मुस्लिम असल्याचा मला सन्मान वाटतो. मी माझ्या उमेदवारीबद्दल बातम्यांमधून ऐकले. पक्ष मला पाठिंबा देत आहे आणि माझ्यासाठी कठोर परिश्रम करत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
२०२१ मध्ये केरळमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सलाम यांनी तिरूरमधून इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या कुरुकोली मोईदीन यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मलप्पुरम हा आययूएमएलचा बालेकिल्ला राहिला आहे, गेल्या वेळी भाजपचे ए. पी. अब्दुल्ला कुट्टी यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. अब्दुल सलाम यांनी १५ देशांमध्ये वैज्ञानिक आणि सल्लागार म्हणून काम केले आहे. परंतु कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांचा कार्यकाळ चढ-उतारांनी भरलेला होता. त्यांना विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.