आधी केली टिंगल मग मागितली माफी !

इटलीच्या अपुलिया शहरात नुकतीच जी-७ परिषद पार पडली. या परिषदेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Tue, 18 Jun 2024
  • 01:36 pm

आधी केली टिंगल मग मागितली माफी !

नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस यांच्या भेटीवरून केलेली टिप्पणी पडली महागात ! केरळ काँग्रेसवर आली माफी मागण्याची वेळ

नवी दिल्ली : इटलीच्या अपुलिया शहरात नुकतीच जी-७ परिषद पार पडली. या परिषदेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधला. मोदी या दौऱ्यावेळी जगभरातील अनेक नेत्यांना भेटले तरी सर्वाधिक चर्चा झाली ती मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीची. इटलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीचा फोटो जगभरात चांगलाच गाजला. या भेटीवरून काँग्रेसने मोदींना काढलेला चिमटा आता काँग्रेसच्या अंगलट आला आहे. काँग्रेसने केलेल्या टीकेवर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे काँग्रेसने ख्रिश्चन समुदायाची माफी मागितली आहे.

जी-७ परिषदेत मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटले. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर केरळ काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्या भेटीचा फोटो शेअर करत पंतप्रधानांवर टीका केली होती. 'अखेर पोपना देवाला भेटण्याची संधी मिळाली' असे कॅप्शन केरळ काँग्रेसने केले होते.  केरळ भाजपने या ट्विटवर आक्षेप घेत काँग्रेसने ख्रिश्चन समाजाचा अपमान केल्याचा दावा केला. काँग्रेसने या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांची तुलना प्रभू येशूंशी केली आहे. हे संपूर्णपणे येशूंना दैवत समजणाऱ्या ख्रिश्चन समाजाचा अपमान करणारे आहे. काँग्रेसने ही पातळी गाठणे लज्जास्पद आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि केरळ भाजप नेते जॉर्ज कुरियन यांनी केली होती. समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली होती. मोदी यांनी अलीकडेच काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. ते म्हणाले होते की, 'त्यांना देवाने काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून पृथ्वीवर पाठवले आहे'  तसेच एका मुलाखतीत ते म्हणाले, मी जैविकदृष्ट्या जन्मलेलो नाही, मी गंगा मातेचा पुत्र आहे. मोदींच्या याच वक्तव्यांचा संदर्भ देत काँग्रेसने म्हटले होते की अखेर पोप देवाला भेटले. दरम्यान, काँग्रेसने या पोस्ट समाजमाध्यमांवरून हटवल्या आहेत. 

काय आहे केरळ काँग्रेसचे स्पष्टीकरण ?
केरळ काँग्रेसने भाजपच्या या टीकेनंतर स्पष्टीकरण देणारे ट्विट करत ख्रिश्चन समाजाची माफी मागितली आहे. 'काँग्रेस पक्ष कधीही कोणता धर्म, धार्मिक समुदाय तसेच धार्मिक पुजारींचा अपमान करत नाही, हे सर्व देशाला माहिती आहे. आम्ही सर्व धर्माला सोबत घेऊन वाटचाल करतो. जगभरातील ख्रिश्चन ज्यांना देव समजतात अशा पोप यांचा अपमान करण्याचा विचार कोणताही काँग्रेस कार्यकर्ता कधी करू शकत नाही.  मात्र, स्वत:ला देव म्हणवून या देशातील आस्तिकांचा अपमान करणाऱ्या नरेंद्र मोदींची थट्टा करण्यात काँग्रेसला अजिबात संकोच वाटत नाही. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ख्रिश्चनांबद्दल खरेच प्रेम असेल तर मणिपूरमध्ये चर्चची जाळपोळ करणाऱ्यांबद्दलही त्यांनी बोलावे आणि त्यांची माफी मागावी. आमच्या पोस्टमध्ये कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व्ही. टी. बलराम यांनी पक्षाच्या पोस्टचा बचाव करत म्हटले की, हे केवळ एक व्यंग होते. यातून केवळ मोदींच्या अलीकडच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली होती. मोदी स्वतःच म्हणाले होते की ते सामान्य व्यक्ती नाहीत, त्यांना ईश्वराने पृथ्वीवर धाडले आहे. 

काय आहे भाजपची टीका ?
मात्र भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने आरोप केला आहे की, काँग्रेसने समस्त ख्रिश्चन बांधव, पोप आणि देवाचा अपमान केला आहे. केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे एक्स हँडल कट्टरपंथी आणि शहरी नक्षलवाद्यांकडून चालवले जात आहे. आता हे लोक पोप फ्रान्सिस आणि ख्रिश्चन समुदायाचा अपमान करू लागले आहेत. सुरेंद्रन यांनी या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि राहुल गांधींकडे याचे उत्तर मागितले आहे. तर, केरळ भाजपचे सरचिटणीस जॉर्ज कुरियन म्हणाले, काँग्रेसच्या या पोस्ट आक्षेपार्ह आहेत. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. काँग्रेसने प्रामुख्याने केरळमधील लोकांचा अपमान केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest