उत्तराखंडमध्ये विजेचा धक्का बसल्याने पंधरा जणांचा मृत्यू
#डेहराडून
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली असून ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटामुळे विजेचा धक्का लागून तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. अलकनंदा नदीजवळ हा स्फोट झाला असून त्यानंतर विजेचा प्रवाह उतरल्याने अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले.
अपघाताच्या ठिकाणी लोखंडी कुंपणामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने अनेकांना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. नमामि गंगे प्रकल्पासाठी एका ठिकाणी काम सुरू होते. त्या ठिकाणी अचानक विजेचा प्रवाह उतरला आणि काही लोकांचा त्यात मृत्यू झाला. या घटनेत १ पोलीस कर्मचारी व २ होमगार्डही जखमी झाले आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पिपळकोटीच्या आऊट पोस्ट पोलीस चौकीच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
अन्य एका माहितीनुसार नदीच्या काठावर एक मृतदेह पडलेला होता. त्याला पाहण्यासाठी काही लोक गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. नदीच्या काठावर नमामि गंगे प्रकल्पांतर्गत काम सुरू असून तेथील अनेक मजूरही विजेच्या धक्क्याने जखमी झालेत. स्थानिक आमदारांच्या माहितीनुसार प्रकल्पस्थळी बुधवारी सकाळी विजेचा तिसरा फेज डाऊन झाला होता. त्याच्या दुरुस्ती वेळी विजेचा प्रवाह उतरला. या प्रकरणी वीज महामंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची पथके मदत कार्यासाठी उपस्थित आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी सर्वप्रकारची मदत पोहोचली आहे. चमोलीचे पोलीस अधीक्षक प्रमोद साहा म्हणाले की, आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी एक लोखंडी कुंपण होते. त्याला पकडून लोक उभे होते. अचानक त्यात विजेचा प्रवाह पसरला आणि लोकांना धक्का बसला.
वृत्तसंस्था