महिला पायलटला पतीसह दिल्लीत संतप्त जमावाने केली बेदम मारहाण
#नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत गंभीर गुन्हे होण्याची मालिका सुरूच असून द्वारका परिसरात एका महिला पायलट आणि तिच्या पतीला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या जोडप्यावर दहा वर्षांच्या मुलीला घरात कामावर ठेवून तिचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता मुलीच्या अंगावर जखमेच्या आणि भाजल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.
द्वारकाचे पोलीस अधीक्षक डीसीपी एम हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर मुलींचे समुपदेशन केले जात आहे.
व्हीडीओच्या सुरुवातीला जमाव या जोडप्याशी वाद घालताना दिसत आहे. महिला पायलट हात जोडून माफी मागत असल्याचे दिसते. मात्र, काही वेळाने जमावाने महिला पायलटला बाहेर ओढत आणले आणि मारायला सुरुवात केली. महिलेचा पती तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने त्यालाही बेदम मारहाण केली.
या जोडप्याने दोन महिन्यांपूर्वी एका १० वर्षांच्या मुलीला घरातील कामासाठी ठेवले होते. बुधवारी मुलीच्या एका नातेवाईकाला हातावर जखमा आढळल्या. त्यानंतर स्थानिक लोकांनी मुलीला मारहाण केल्याचा आरोप करत या दाम्पत्याला मारहाण केली आहे.
वृत्तसंस्था