वडीलच करायचे लैंगिक शोषण

तमिळ अभिनेत्री आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी आपल्या वडिलांनीच लहानपणी आपले लैंंगिक शोषण केल्याची माहिती उघड केल्यावर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही आपल्या जीवनातील अशाच घटनांची माहिती जाहीर केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Mar 2023
  • 10:40 am
वडीलच करायचे लैंगिक शोषण

वडीलच करायचे लैंगिक शोषण

अभिनेत्री खुशबू पाठोपाठ दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची धक्कादायक माहिती

#नवी दिल्ली

तमिळ अभिनेत्री आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी आपल्या वडिलांनीच लहानपणी आपले लैंंगिक शोषण केल्याची माहिती उघड केल्यावर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही आपल्या जीवनातील अशाच घटनांची माहिती जाहीर केली आहे. 

स्वाती मालीवाल म्हणाल्या की, माझ्या स्वत:च्या वडिलांनी बालपणी लैंगिक शोषण केले आहे. ज्या काळात आपल्याला काही कळत नाही अशा वयात आपण जे समोर येते ते स्वीकारत जातो. जसजशी आपली समज वाढत जाते तेव्हा त्याचा अर्थ कळायला लागतो. लहानपणी ते मला खूप मारायचे. वडील जेव्हा घरी यायचे तेव्हा मी खूप घाबरायची. अनेक वेळा पलंगाखाली मी दडून बसायचे. लहानपणी अनुभवाला आलेल्या या घटनांचा नंतर मी साकल्याने विचार करायला लागले तेव्हा मी ठरवले की, आता आपण महिलांना त्यांचे अधिकार मिळण्यासाठी प्रयत्न करायचे. बालकांच्या नकळत्या काळात त्यांचे शोषण करणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा असे मी ठरवले होते.

आपल्याला लहानपणी ज्या अनुभवांना सामोरे जावे लागले त्याबाबत मालीवाल म्हणाल्या की, माझे वडील केस धरायचे आणि भिंतीवर डोके आपटायचे. डोके धडकल्याने जखमा व्हायच्या, रक्त यायचे. मला वाटते की एखाद्या व्यक्तीवर जेव्हा जास्तीत जास्त अत्याचार होतात, तेव्हा त्या व्यक्तीला इतरांच्या वेदना समजायला लागतात. त्यातूनच तुमच्यामध्ये एक तीव्र भावना निर्माण होते आणि त्यातून साऱ्या व्यवस्थेला धक्के देण्याची प्रक्रिया सुरू होते. मी चौथीच्या वर्गात प्रवेश करेपर्यंत वडिलांच्या समवेत राहात होते. त्या काळात वडिलांच्या अत्याचाराचा, लैंगिक शोषणाचा अनुभव अनेक वेळा घेतला. 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी सोमवारी आपल्या आयुष्यातील त्या धक्कादायक घटनांचा गौप्यस्फोट केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, माझ्या वयाची आठ वर्षे पूर्ण होईपर्यंत वडील लैंगिक शोषण करायचे. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर, कठीण काळ होता. जेव्हा मी पंधरा वर्षांची झाली तेव्हापासून मी विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर मात्र वडिलांनी आम्हाला खडतर, अडचणीच्या स्थितीत सोडून घराचा त्याग केला. अभिनेत्री म्हणून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या खुशबू या राजकारणात प्रवेश करताना  प्रथम काँग्रेसमध्ये दाखल झाल्या. त्यानंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जयपूरमध्ये वी द विमेन या संघटनेने सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात खुशबू यांनी वरील घटनांचा उल्लेख केला होता. त्यानंतरही आपण आपल्या आयुष्यातील धक्कादायक घटनांचा जाहीर गौप्यस्फोट केला त्याची आपणाला लाज वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest