आजपासून शेतकऱ्यांचे पुन्हा 'दिल्ली चलो'
#चंदीगड
डाळी, मका आणि कापूस पाच वर्षांसाठी सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव संयुक्त किसान मोर्चाने फेटाळला असून २३ पिकांची खरेदी हमीभावाने करायला हवी, असा आग्रह धरला आहे. आजपासून (बुधवार) 'दिल्ली चलो' आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याचे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी सांगितले.
शेतमालाच्या खरेदीसाठी 'एमएसपी'ची कायदेशीर हमी व इतर मागण्यांसाठी हजारो शेतकरी पंजाब-हरयाणाच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत वाणिज्य आणि उद्योगमंत्री गोयल यांच्यासह कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा व गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शेतकऱ्यांच्या नेत्यांसोबत रविवारी (१८ फेब्रुवारी) चर्चा केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. सरकारच्या प्रस्तावावर विचारविनिमय करून आम्हे पुढचा निर्णय घेऊ, असे संयुक्त किसान मोर्चातर्फे सांगण्यात आले होते. दरम्यान केंद्र सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी चर्चा केली. त्यात हा प्रस्ताव शेतकरी हिताचा नसल्याबाबत एकमत झाले. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शेतकरी नेते जगजीतसिंग डल्लेवाल यांनी सांगितले.वृत्तसंंस्था