घरकामाची अपेक्षा हे क्रौर्य नाही
#नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे की, पतीने त्याच्या पत्नीकडून घरातील काम करण्याची अपेक्षा करण्याला क्रूरता म्हणता येणार नाही. तसेच एखाद्या महिलेला घरातील काम करण्यास सांगितले तर त्याचा अर्थ असा नव्हे की तिला मोलकरणीसमान वागणूक दिली जातेय. बऱ्याचदा पती घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या उचलतात तर पत्नी घरातील जबाबदारी स्वीकारते. घटस्फोटाची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बंसल यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला आहे.
घरातील कामांना क्रूरता म्हणत एका महिलेने तिच्या पतीकडे घटस्फोटाची मागणी केली होती. परंतु, कौटुंबिक न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर पत्नीचा पतीबरोबर असलेला व्यवहार चुकीचा आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने पतीच्या मागणीवर घटस्फोट मंजूर केला आहे. या जोडप्याचे २००७ मध्ये लग्न झाले होते. या जोडप्याला १७ वर्षांचा एक मुलगा आहे. पतीने न्यायालयासमोर म्हटले होते की, त्याची पत्नी त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी नेहमी भांडायची, कुठल्याच गोष्टींवर त्यांच्यात कधी एकमत व्हायचे नाही. त्यामुळे घरात नेहमी तणावाचे वातावरण असायचे. तसेच पत्नी नेहमी वेगळे राहण्याची मागणी करायची. अखेर पतीने पत्नीच्या मागणीला झुकते माप देत पत्नीबरोबर वेगळा संसार थाटला. परंतु, त्यानंतर काही दिवसांनी पत्नी तिच्या आई-वडिलांबरोबर माहेरी राहू लागली. पत्नीने पती नेहमी कामानिमित्त घराबाहेर राहात असल्याचे कारण पुढे केले होते. यावर न्यायालयाने म्हटले आहे की, महिलेने वेगवेगळी कारणे देत तिचे सासरचे घर सोडून पतीला वेगळा संसार थाटायला लावला आणि त्यानंतर आपल्या आई-वडिलांबरोबर माहेरी राहू लागली.
न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देताना म्हटले आहे की, वैवाहिक बंध जोपासण्यासाठी, ते वृद्धिंगत करण्यासाठी पती आणि पत्नीने एकत्र राहायला हवे. सतत वेगळे राहणे चांगल्या नात्यासाठी घातक आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निष्कर्ष काढला आहे की, पत्नीची एकत्र कुटुंबात तसेच पतीबरोबर राहण्याची इच्छा दिसत नाही. महिलेने तिचे वैवाहिक कर्तव्य पार पाडलेले दिसत नाही. तसेच तिने तिच्या पतीला आपल्या मुलाला भेटण्यास मज्जाव केला. पतीला तिच्या पितृत्वापासून वंचित ठेवले. पतीने त्याच्या पत्नीला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु, पत्नी त्याच्याबरोबर राहण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे हे न्यायालय पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करत आहे.