‘तुम्ही विश्वगुरू असालही, तरीही इंग्रजी कौशल्य दाखवण्यापासून लांब राहा’
#नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला अमेरिका दौरा कमालीचा यशस्वी झाल्याची प्रसिद्धी भारतीय जनता पक्ष करत असला तरी त्यातील त्रुटी दाखवण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. दौऱ्यातील मोदींच्या भेटीगाठींपासून ते अमेरिकन प्रतिनिधीगृहातील भाषणापर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा चालू आहे.आता प्रतिनिधीगृहातील आणि अन्य ठिकाणच्या मोदींच्या भाषणावरून शेरेबाजी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी मोदी यांच्या नावाचा उल्लेख न करता जाहीर सल्ला दिला आहे. ते म्हणतात की, त्यांनी हिंदीपर्यंत मर्यादित राहावे. तुम्ही विश्वगुरू असालही, पण तरीही इंग्रजी कौशल्य दाखवण्यापासून लांब राहा. पॉलिटिकल सायन्स या विषयात एमए पूर्ण केलेल्या व्यक्तीला टेलिप्रॉम्प्टरवरूनही इंग्रजी वाचण्यात अडचण यावी, म्हणजे काय?
प्रशांत भूषण यांनी ट्वीटमध्ये मोदींना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये मोदी यांनी भाषणात काही शब्दांचा चुकीचा उच्चार केल्याचा दावा केला आहे. यामध्ये ‘इन्व्हेस्ट’चा ‘इन्व्हेस्टिगेट’, ‘ऑप्टिकल फायबर’चा ‘पोलिटिकल फायबर’ किंवा ‘रिलेशनशिप’चा ‘रिलेशनसिपी’ असा उच्चार केल्याचे दिसते. व्हीडीओच्या सत्यतेबाबत प्रशांत भूषण यांनी कोणताही उल्लेख केलेला नाही.
प्रशांत भूषण यांच्या या ट्वीटवरून काहीजणांनी त्यांनाच ट्रोल केले आहे. बॉलिवूड अभिनेता केआरकेने याबद्दल ट्वीट केले आहे. त्यानेही मोदींचे नाव घेतलेले नाही. तो म्हणतो की, कोणत्याही देशाचा पंतप्रधान इंग्रजी बोलण्याइतपत शिक्षित नसेल तर काही हरकत नाही. पण त्याने भयंकर इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी त्याने स्वतःच्या भाषेत बोलायला पाहिजे. टेलीप्रॉम्प्टर वापरल्यानंतर चुकीचे इंग्रजी बोलणं आणि स्वतःची चेष्टा करून घेण्यात उपयोग नाही.
वृत्तसंस्था