काश्मीरसह चार राज्यांत निवडणूक

या वर्षी देशातील जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने या चारही राज्यांना २० ऑगस्टपर्यंत मतदारयादी अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत. मतदार डेटा अपडेट केल्यानंतर, निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 22 Jun 2024
  • 11:24 am
Political News

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र, झारखंड, हरियाणाचाही समावेश, निवडणूक आयोगाने चारही राज्यांना दिले २० ऑगस्टपर्यंत मतदार यादी अद्ययावत करण्याचे निर्देश

नवी दिल्ली: या वर्षी देशातील जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने या चारही राज्यांना २० ऑगस्टपर्यंत मतदारयादी अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत. मतदार डेटा अपडेट केल्यानंतर, निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी जम्मू-काश्मीर,  हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांतील परिस्थिती खालीलप्रमाणे आहे.

जम्मू आणि काश्मीर

सरकार : राष्ट्रपती राजवट

कार्यकाळ संपला : विधानसभा २०१८पासून विसर्जित

अपेक्षित निवडणुका : सप्टेंबर २०२४

२०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या. कालांतराने येथे सत्तेत असलेली भाजप-पीडीपी युती तुटली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आले. तसेच राज्य २ केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विभागले गेले. याआधी २०१४ मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती. २०१८ मध्ये भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे युतीचे सरकार पडले. कारण भाजपने पीडीपीसोबतची युती तोडली.

सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२३ मध्ये निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एका मुलाखतीत जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते.

लोकसभा निवडणूक २०२४ : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला २ जागा मिळाल्या

जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या ५ जागांपैकी जम्मू आणि उधमपूरच्या जागा भाजपच्या खात्यात गेल्या. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला येथे २ जागा मिळाल्या. बारामुल्ला मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

महाराष्ट्र

सरकार : भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार गट)  

मुदत समाप्ती :  ८ नोव्हेंबर २०२४

दोनदा मुख्यमंत्री बदलले, दोन पक्ष फोडले

२०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणुका झाल्या. १०५ आमदारांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली. शिवसेनेने ५६ आमदारांसह काँग्रेसच्या ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांच्या मदतीने महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

मे २०२२ मध्ये महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांसह बंडखोरी केली. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात अशी दोन गटात विभागली गेली.  १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव 'शिवसेना' आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' एकनाथ शिंदे गटाकडेच राहण्याचे आदेश दिले.

२०२३ मध्ये भाजपने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षदेखील फोडला. अजित पवार यांनी बंड करून भाजप-शिंदे सेना युतीला  सोथ दिली आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत ४० आमदार होते.

लोकसभा निवडणूक २०२४ : भाजपला दणका, इंडिया आघाडीची सरशी

४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा वारंवार दावा करणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ ९ जागा जिंकता आल्या. युतीचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक जागा जिंकली. शिवसेना शिंदे गटाने ७ जागा जिंकत तुलनेत चांगली कामगिरी बजावली. दुसरीकडे, इंडिया आघाडीने तबब्ल ३० जागा जिंकल्या. १३ जागा जिंकत काँग्रेस राज्यातील अव्वल क्रमांकावरील पक्ष ठरला. शिवसेनेच्या ठाकरे गटाने ९ तर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटाने ८ जागा काबीज केल्या.  सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. नंतर त्यांनी काॅंग्रेसला समर्थन दिले.

हरियाणा

सरकार : भाजप

मुदत समाप्ती : ३ नोव्हेंबर २०२४

अपेक्षित निवडणुका : ऑक्टोबर २०२४

हरियाणात भाजप-जेजेपी युतीचे सरकार होते, दोघेही यावर्षी वेगळे झाले

२०१९ मध्ये हरियाणामध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. ज्यामध्ये भाजपला ४१ तर जेजेपीला १० जागा मिळाल्या. भाजपने ६ अपक्ष आणि एक हलोपा आमदारांसह सरकार स्थापन केले. मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, त्यांना त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

यावर्षी १२ मार्च रोजी जेजेपी आणि भाजपची युती तुटली. सैनी यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मनोहर लाल खट्टर यांच्या जागी नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आपल्याला ४८ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. या बैठकीला भाजपचे ४१ आणि ७ अपक्ष आमदार उपस्थित होते. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ४६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता.

लोकसभा निवडणूक २०२४ : भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ५ जागा मिळाल्या. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी ५ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये भाजपने येथे १० पैकी १० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला येथे एकही जागा मिळवता आली नाही नव्हती. त्यांचे दिग्गज नेतेही निवडणुकीत पराभूत झाले होते. यावेळी मात्र, काॅंग्रेसच्या नेत्यांनी उकदिलाने काम करीत या राज्यात भाजपला तोडीस तोड टक्कर दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest