हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
#लखनौ
रामायण, महाभारत या केवळ कलाकृतीच नाहीत, या देशातील हिंदूंच्या अध्यात्मिक श्रद्धास्थांनाच्या आदर्श कहाण्या या ग्रंथात आहेत. केवळ हिंदू सहिष्णू आहेत, सहन करतात म्हणून काय वाटेल ते दाखवणार आहात का? असा संतप्त सवाल करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने 'आदिपुरुष'वरून या चित्रपटाचे दिग्दर्शक, पटथालेखक, निर्मात्यांवर ताशेरे ओढले आहेत. चित्रपटविषयक स्वातंत्र्य या नावाखाली बहुसंख्याकांच्या भावना दुखावणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला संमती देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचीही न्यायालयाने खरडपट्टी काढली आहे.
आदिपुरूष चित्रपटावरून सध्या देशभरात वादंग सुरू आहे. रावण, हनुमान, श्रीराम अशा देवतांचे विचित्रीकरण करण्यात आल्यामुळे हा चित्रपटाबद्दल बहुसंख्याकांत संतापाची भावना आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने चित्रपटाच्या दिगदशक, निर्मात्यावर कडक ताशेरे ओढले आहेत. या चित्रपटाच्या उत्तर प्रदेशातील प्रदर्शनाला विरोध करणाऱ्या नऊ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर एकत्रित सुनावणी सुरु आहे. सुनावणीचा बुधवारी तिसरा दिवस होता. हिंदू सहन करतात म्हणून काहीही दाखवता का? कुरानवर साधा माहितीपट काढून दाखवा मग पहा काय परिणाम होतात ते. कलाकृतीच्या नावाखाली हिंदूंच्या भावना दुखावण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले आहेत? अशा वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाला मान्यता देताना सेन्सॉर बोर्डाने याकडे कसे काय दुर्लक्ष केले? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
नुसते संवाद हटवून काय होणार?
या चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद काढण्यात आले असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला दिली. केवळ संवाद काढून टाकल्याने काय फरक पडणार आहे? चित्रपटात जो तमाशा दाखवला आहे त्याचे काय करणार आहात? असे प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने 'हनुमानचालिसा' वाचल्याशिवाय जेवत नाहीत, असे लोक या देशात आहेत, 'रामचरितमानस' वाचल्याशिवाय दिवस जात नाही, असे लोक या देशात असल्याचे निरीक्षण नोंदवले. चित्रपटाचे संवाद लिहिलेल्या मनोज मुंतसिरला नोटीस बजावली आहे. त्याला प्रतिवादी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.