सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्या नावाची चर्चा
#बंगळुरू
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कोणाचेही नाव पुढे करावयाचे नाही असा धोरणात्मक निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. मात्र, असे असले तरी आगामी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या चर्चेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे आघाडीवर आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावताना हे दोन्ही नेते कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेस पक्षाला राज्यात बहुमत मिळणार नाही.
काँग्रेस पक्ष आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कोणाचेही नाव पुढे का करत नाही या प्रश्नाला उत्तर देताना जोशी म्हणाले की, उमेदवार जाहीर करण्यासाठी काँग्रेसला बहुमत मिळवून सत्तेवर यावे लागणार आहे. शिवकुमार की सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार का हा माझ्यासमोरच नव्हे तर राज्यातील जनतेसमोरही प्रश्न नाही. प्रसारमाध्यमे असा प्रश्न का विचारतात हेच मला कळत नाही. काँग्रेसला बहुमत मिळणार नसल्याने या दोन नेत्यांपैकी कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. त्यांनी अशी स्वप्ने पाहण्याचे सोडून द्यावे.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी १६६ मतदारसंघातील उमेदवार काँग्रेस पक्षाने जाहीर केलेले आहेत. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे राज्यसभा सदस्य रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, ही निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे एकही चेहरा नाही. उमेदवारीसाठी त्यांना सक्षम नेत्यांचा शोध घ्यावा लागत आहे. काँग्रेसने अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपला एकही उमेदवार जाहीर करता आलेला नाही. मला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना असा प्रश्न विचारायचा आहे की त्यांना कशाची भीती वाटत आहे. उमेदवार जाहीर केले तर त्यावरून पक्षात समस्या निर्माण होतील अशी भीती नड्डा, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना वाटत आहे का ?
दरम्यान, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जर आपला पक्ष सत्तेवर आला तर बोम्मई सरकारने रद्द केलेले मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण परत दिले जाईल, असे जाहीर केले. मार्चमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुस्लिमांचे आरक्षण रद्द करून ते वोक्कलिंग आणि लिंगायत या दोन जमातींमध्ये त्याचे वाटप करण्याचे जाहीर केले होते. गुरुवारी काँग्रेसने पक्षाच्या ४१ उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसने सर्वोदया कर्नाटक पार्टी या पक्षांशी निवडणूक समझोता केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विजयाची क्षमता लक्षात घेऊन पक्षाचे उमेदवार अंतिम केले जातील असे सांगितले. पक्षाच्या उमेदवारांची यादी ८ एप्रिलला जाहीर होईल असेही ते म्हणाले. काँग्रेसने आपली पहिली १२४ उमेदवारांची यादी २५ मार्च रोजी जाहीर केली होती. त्यात सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या नावाचा समावेश होता.