निराश साक्षी मलिकचा कुस्तीला रामराम; कुस्ती संघटनेच्या निवडणूक निकालानंतर टोकाचा निर्णय

भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी महिला व्यक्तीची निवड करावी, अशी विनंतीही करण्यात आली होती. महिला अध्यक्ष झाल्या असत्या, तर लैंगिक शोषणासारखा प्रकारच घडला नसता;

SakshiMalikquitwrestling

निराश साक्षी मलिकचा कुस्तीला रामराम; कुस्ती संघटनेच्या निवडणूक निकालानंतर टोकाचा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी संजयसिंह या ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या निकटवर्तीयांची निवड झाली. त्यांचेच वर्चस्व निवडणुकीत कायम राहिले. यामुळे निराश झालेली ऑलिंपिक, आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पदकविजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीला रामराम करण्याचा निर्णय घेतला. नव्या कार्यकारिणीच्या उपस्थितीत मी कुस्ती खेळणार नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक नवी दिल्ली येथे गुरुवारी पार पडली. या निवडणुकीत १५पैकी १३ जागांवर ब्रिजभूषण शरणसिंह यांचे संबंधित जिंकून आले. त्यानंतर साक्षी मलिक, बजरंग पुनिया व विनेश फोगाट या निराश झालेल्या कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद बोलावून आपले परखड मत व्यक्त केले.

साक्षी मलिक या वेळी म्हणाली, भारतीय कुस्तीमधील गैरप्रकार टाळावेत, यासाठी आम्ही कुस्तीपटूंनी प्रचंड मेहनत केली. रस्त्यांवर ४० दिवस झोपलो. देशातील विविध भागांमधून आलेल्या माणसांकडून आम्हाला सहकार्य मिळाले; पण तरीही निवडणुकीत ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या संबंधितांचा विजय झाला. त्यामुळे आता मी निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे.  साक्षी मलिक पुढे म्हणाली, भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी महिला व्यक्तीची निवड करावी, अशी विनंतीही करण्यात आली होती. महिला अध्यक्ष झाल्या असत्या, तर लैंगिक शोषणासारखा प्रकारच घडला नसता; पण ती विनंतीही मान्य करण्यात आली नाही. निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या यादीवर लक्ष टाकल्यास त्यामध्ये महिला नाहीत, हेही दिसून येत आहे. यापुढेही आम्ही लढत राहू. पुढच्या पिढीतील कुस्तीपटूही लढतील.

सरकार शब्दाला जागले नाही : बजरंग पुनिया

ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या निकटवर्तीयांना निवडणुकीला उभे राहायला देऊ नका, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे करण्यात आली होती; पण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. सरकार आपल्या शब्दाला जागले नाही, असे मत बजरंग पुनियाकडून व्यक्त करण्यात आले. आगामी काळात युवा महिला कुस्तीपटूंचेही शोषण होणार, अशी प्रतिक्रिया विनेश फोगाट हिने याप्रसंगी दिली. मात्र बजरंग पुनिया व विनेश फोगाट यांनी कुस्ती सोडण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest