वाघांचे हल्ले वाढल्यामुळे डोंगराळ भागात संचारबंदी
#डेहराडून
वाघांच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थ ठार झाल्याने सोमवारी दोन जिल्ह्यांतील डोंगराळ भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी सायंकाळी सातपासून सकाळी सहापर्यंत लागू असेल. सोमवारपासून दोन दिवसांसाठी अंगणवाडी आणि शाळाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघांच्या हल्ल्यात झालेला पहिला मृत्यू हा गुरुवारी तर दुसरा मृत्यू हा रविवारी सायंकाळी नोंदवला गेला. हे दोन्ही मृत्यू एकाच वाघाच्या हल्ल्यात झाले आहेत की वेगवेगळ्या याचा तपशील अद्याप मिळालेला नाही. पौरी जिल्ह्यातील घटनेनंतर रिखनिखाल भागातील २५ गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. वन कर्मचारी महेंद्रसिंग रावत यांच्या माहितीनुसार रणवीर सिंग नेगी शेतकऱ्याचा अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळला आहे. कॉर्बेट व्याघ्र अभयारण्याजवळच्या सिमली गावात नेगी हे एकटे राहात होते.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात देशातील वाघांची सख्या तीन हजारांहून अधिक झाल्याचे सांगण्यात आले होते. ही बाब आनंदाची असली तरी वाढते नागरीकरण आणि वाघांच्या नैसर्गिक अधिवासात होत असलेली घट या कारणांमुळे वाघांचे नागरी वस्तीकडे सरकणे सतत दृष्टिक्षेपात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या हल्ल्यांमध्येही वाढ होत आहे. २०१९ ते २०२१ च्या मध्यापर्यंत वाघांनी केलेल्या हल्ल्यात १०८ नागरिक मारले गेले होते. जंगलाभोवती नागरीकरण अधिक प्रमाणात होत असल्याने वाघ आणि मानव संघर्षाची स्थिती वारंवार उद्भवत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. गेल्या वर्षी चंपारण्याचा नरभक्षक अशी ओळख निर्माण झालेल्या वाघाची पूर्व भारतात गोळ्या गालून हत्या करावी लागली होती.
वृत्तसंस्था