मुकुल रॉय यांच्या घरवापसीवरून वादंग
#कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य व दिग्गज नेते मुकुल रॉय यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याची तयारी केली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे; पण त्याचवेळी भाजपमधील नेत्यांनीही रॉय यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आहे. रॉय यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे. रॉय आजारी असून कोणीतरी त्यांच्या आजाराचा गैरफायदा उचलत असल्याचा खुलासा त्यांच्या मुलाने केला आहे, तर दुसरीकडे पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या भाजपमध्ये परतण्याला विरोध दर्शवला आहे.
देशाचे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. रॉय यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय याने पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून वडील मुकुल रॉय बेपत्ता झाल्याचे सांगितले होते. मंगळवारी (१८ एप्रिल) अचानक मुकुल रॉय यांनी एका बंगाली वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी अजूनही भाजपामध्येच असून मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला दिल्ली येथे आलो आहे. मी अजूनही भाजपाचा आमदार आहे. मला पक्षासोबतच राहायचे आहे. पक्षानेच दिल्लीत राहण्याची माझी सोय केली असल्याचे ते म्हणाले होते.
मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. एकेकाळी तृणमूलचे मुख्य रणनीतीकार आणि पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र २०१७ साली पक्षातील नेत्यांशी वितुष्ट आल्यानंतर त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुकुल रॉय यांच्यामुळे भाजपाला पश्चिम बंगालमध्ये १८ जागा जिंकता आल्या होत्या. २०२० साली भाजपाने रॉय यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला. २०२१ साली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावर क्रिष्णानगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र निकालानंतर तृणमूल काँग्रेसची राज्यात सत्ता आल्यामुळे त्यांनी भाजपाला सोडून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये गेले असले तरी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. दरम्यान तृणमूल काँग्रेसने त्यांना लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देऊ केले होते. जून २०२२ मध्ये भाजपाने त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या काही काळापासून रॉय सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. मार्च महिन्यात त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून ते सार्वजनिक स्थळी जाणे टाळत होते.
मुकुल रॉय हे पुन्हा एकदा भाजपामध्ये येणार असल्याचे संकेत भाजपाचे राष्ट्रीय सचिव अनुपम हजरा यांनी दिले आहेत.
वृत्तसंस्था