ई-सिगारेट विकणाऱ्या संकेतस्थळांवर गंडांतर
#नवी दिल्ली
ई-सिगारेटची विक्री करणाऱ्या १५ संकेतस्थळांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोटीस बजावली आहे. ई-सिगारेटवर भारतात बंदी असल्यामुळे, त्याची विक्री करणे बेकायदेशीर आहे. या संदर्भात आणखी सहा संकेतस्थळ रडारवर असून, मंत्रालय सोशल मीडियावर देखील नजर ठेऊन असणार आहे.
या १५ संकेतस्थळांपैकी चार संकेतस्थळांनी ई-सिगारेटची विक्री बंद केली असून, इतरांनी अद्याप नोटीसला उत्तर दिले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. तुमच्या संकेतस्थळावर ई-सिगारेटबाबत जाहिरात आणि विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ई-सिगारेट प्रतिबंध कायद्याअंतर्गत हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे पुराव्याला धक्का न पोहचवता अशा प्रकारची माहिती संकेतस्थळावरून काढून टाकावी, असे या संकेतस्थळांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
जर त्यांनी वेळेत उत्तर दिले नाही, आणि कायद्याचे पालन केले नाही, तर आरोग्य मंत्रालय याबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाला हे संकेतस्थळ बंद करण्याचे निर्देश देईल. तसेच, या वेबसाईटवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. नोटीस मिळाल्यापासून ३६ तासांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश या संकेतस्थळांना देण्यात आले आहेत. यातील चार कंपन्यांनी उत्तर दिले असून, बाकीच्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आम्ही करत आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यासोबतच, सोशल मीडियावर पोस्ट होत असलेल्या ई-सिगारेटच्या जाहिरातींवरही मंत्रालयाचे लक्ष असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.