संग्रहित छायाचित्र
लोकप्रिय चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा एका नव्या कायदेशीर अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. ११ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) विभागीय सचिव रामलिंगम यांनी चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात मड्डीपाडू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश, सून आणि इतर टीडीपी नेत्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी चित्रपट निर्मात्याने सोशल मीडियाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
राम गोपाल वर्मा हे नेहमीच राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट विधाने करत असतात. ते वायएसआर काँग्रेस पक्षाचे समर्थक आहेत. अलीकडे ते चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पक्षाविरोधात वक्तव्ये करत आहेत.राम गोपाल वर्माचा 'व्यूहम' हा चित्रपट याच वर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू आणि त्यांचा मुलगा जगन मोहन रेड्डी यांच्या राजकीय प्रवासावर आधारित होता. हा चित्रपट गेल्या वर्षी आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रदर्शित होणार होता, मात्र वादामुळे चित्रपट पुढे ढकलावा लागला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती, कारण हा चित्रपट आपल्या कुटुंबाची प्रतिमा खराब करण्यासाठी बनवला गेला आहे. या वादांच्या दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचे प्रमोशन करताना अनेक सोशल मीडिया पोस्ट केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. त्यांनी त्यांचा एक मॉर्फ केलेला फोटोही पोस्ट केला होता, ज्यावर आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.विवादांनंतर, मागील वर्षी १३ डिसेंबर रोजी, चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने यू प्रमाणपत्र दिले, त्यानंतर हा चित्रपट यंदा २ मार्च रोजी प्रदर्शित झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.