नूहमधील जातीय हिंसाचार सुरूच; दिल्लीमध्ये अतिदक्षतेचा इशारा
#चंडीगड
हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सोमवारपासून सुरु असलेला हिंसाचार अद्याप सुरू असून तो इतर जिल्ह्यातही पसरत आहे. हा हिंसचार बुधवारीही सुरु होता. हरियाणातील अशांत परिस्थिती पाहता दिल्लीमध्येही हाय अलर्ट जारी केला आहे. एएनआयच्या माहितीनुसार दिल्लीच्या अनेक भागात पोलिस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. अनुचित स्थितीला सामोरे जाण्यासाठी ही तयारी केली जात आहे.
दरम्यान, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली-फरीदाबाद रस्ता बंद केला आहे. बदरपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते नूह हिंसाचाराच्या विरोधात देशात निदर्शने करणार आहेत.
दिल्लीमध्ये एकूण २९ ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद निदर्शने करण्याच्या तयारीत आहे. नूह आणि त्यानंतर हरियाणाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारासंदर्भात एएनआयने चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे. गुरुग्राममध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारात जमावाने एका मशिदीला आग लावली होती. त्यात एका मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण अधिक तापलं आहे.
दिल्लीपासून ५० किलोमीटर अंतरावरील नूह जिल्ह्यात सोमवारी धार्मिक रॅलीदरम्यान हिंसाचार उफाळून आला होता. नूहमधील चौकात आलेल्या रॅलीवर १२ ते १५ लोकांच्या जमावाने दगडफेक केली होती. तसेच परिसरातील गाड्यांना पेटवून दिले होते. त्यामुळे जवळपास २५०० लोकांनी मंदिरात आश्रय घेतला होता. पोलिसांच्या मदतीने तब्बल ५ तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मंगळवारच्या हिंसाचारात एकूण ४ लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हरियाणात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालये, शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
वृत्तसंंस्था