अतिक अहमदच्या हत्येच्या चौकशीसाठी आयोग
#लखनौ
कुख्यात गुंड आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची पोलिसांच्या समोर झालेल्या हत्येची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यांचा न्यायालयीन आयोग नेमला आहे. या तीन सदस्यांच्या आयोगाचे नेतृत्व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरविंदकुमार त्रिपाठी हे करणार असून निवृत्त न्यायमूर्ती ब्रिजेशकुमार सोनी, माजी पोलीस महासंचालक सुभेश कुमारसिंग हे अन्य दोन सदस्य आहेत. चौकशी आयोग कायदा १९५२ नुसार या आयोगाची स्थापना केली असून त्यांना दोन महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत दिली आहे.
शनिवारी रात्री प्रयागराज येथे पत्रकार असल्याचे भासवून आलेल्या तिघांनी अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांची पोलिसांच्या समोरच गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन रविवारी प्रयागराज येथे जमावबंदी लागू केली असून तेथील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. अयोध्या शहरातील सर्व मोक्याच्या ठिकाणी तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. राम मंदिराच्या परिसरात सुरक्षा कडक करण्यासाठी केंद्रीय निम लष्करी दलाबरोबर स्थानिक पोलिसांची मदत घेतली आहे.
कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून अहमद बंधूंना वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना गोळीबाराची घटना घडली. ज्यांनी गोळीबार केला त्यांची ओळख पटली असून सनी सिंग, लव्हलेश तिवारी आणि अरुण मौर्य अशी त्यांची नावे आहेत. गोळीबार झाल्या झाल्या त्यांनी शरणागती पत्करली असून त्यांची पोलीस आता चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद हा पोलिसांच्या कथित चकमकीत मारला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोळीबारात अतिक अहमद हा मारला गेला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक बोलावून राज्यातील कायदा स्थितीचा आढावा घेतला. राज्य सरकारने शुक्रवारी झालेल्या घटनेचा सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे. दरम्यान, या प्रकरणी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. यापूर्वी १७ पोलिसांना निलंबित केल्याचे वृत्त होते.
या प्रकरणात शरण आलेले लव्हलीश तिवारी, सनी सिंग, अरुण मौर्य यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यापासून आपले संबंध तोडलेले आहेत. तिवारी यापूर्वी तुरुंगात जाऊन आलेला आहे. त्याचे वडील यग्या तिवारी म्हणाले की, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. शनिवारी घटना घडताना आम्ही ती टीव्हीवर पाहिली आहे. लव्हलीश माझा मुलगा आहे. तो काय करतो त्याची आम्हाला काही माहिती नाही. आमचा त्याच्याशी गेले काही वर्षे संबंध नाही. आम्ही त्याच्याशी बोलतही नाही. तो आमच्याजवळ राहात नाही. आमच्या घरातील व्यवहारात तो सहभाग घेत नाही. त्याला अमली पदार्थांचे व्यसन असून त्यासाठी तो तुरुंगात गेलेला आहे. तो कोणतेही काम करत नाही.
पोलिसांच्या गोळीबारात लव्हलेशच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर प्रयागराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सनी सिंगवर १४ खटले दाखल असून बऱ्याच दिवसांपासून तो फरार आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून त्यानंतर आपल्या हिश्श्याचे पैसे घेऊन त्याने पाच वर्षांपूर्वी घर सोडले आहे. तेव्हापासून त्याने आपले घर किंवा आई, भावांची भेट घेतलेली नाही. तिसरा शूटर अरुण मौर्य २०१० मध्ये एका पोलिसाची हत्या केल्याच्या प्रकरणात त्याचे नाव आले होते. तो दिल्लीतील एका कारखान्यात काम करत होता. तिघेही प्रयागराजमधील एका लॉजमध्ये राहात होते. त्यांना गुन्हेगारीतून प्रसिद्धी मिळवायची होती. त्यामुळे त्यांनी अतिक अहमदला गोळ्या घातल्याचे त्यांनी चौकशी वेळी सांगितले. या तीनही शूटरकडे पत्रकार असल्याचे बनावट पत्र, कॅमेरा आणि माईक आढळला होता.
वृत्तसंस्था