संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सर्वसमावेशक आणि कल्पक असा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सातत्याचा विश्वास असून हा अर्थसंकल्प युवक, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तंभांचे सबलीकरण करेल. हा अर्थसंकल्प २०४७ मधील विकसित भारताचा पाया रचण्याची हमी देतो. एक चांगला अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मी अर्थमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दिली. आजच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सूट योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे मध्यमवर्गातील एक कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे. आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी टांगती तलवार ठेवली होती. ती आम्ही बाजूला केली. नॅनो डीएपीचा उपयोग, नव्या पशू योजना, पीएम मत्स्य संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर तेलबिया अभियान अशा योजनांचा समावेश यात आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच शिवाय खर्चही कमी होईल. (Budget News)
कालच्या अर्थसंकल्पावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया:
देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प : अजित पवार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करून देशवासियांची मने जिंकणारा आहे. या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरला आहे.
लोकांच्या अपेक्षांवर पाणी : प्रियांका चतुर्वेदी
या थंडीच्या मोसमात अर्थमंत्र्यांनी देशातील जनतेच्या आशेवर थंड पाणी ओतले आहे. गरीब, तरुण आणि महिलांसाठी काहीही केले नाही. गेल्या १० वर्षांत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. ही फसवणूक असल्याची टीका शिवसेनेच्या (उद्धव गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली.
हा अर्थसंकल्प 'वोट-ऑन अकाउंट' : तिवारी
हा अर्थसंकल्प 'वोट-ऑन-अकाउंट' आहे ज्याचा एकमेव उद्देश चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारला आर्थिक सुस्थितीत ठेवणे हा आहे. चिंतेची बाब म्हणजे अर्थसंकल्पात १८ लाख कोटी रुपयांची तूट आहे. याचा अर्थ सरकार आपल्या खर्चासाठी कर्ज घेत आहे. पुढील वर्षी हा आकडा आणखी वाढणार आहे.
रोजगाराच्या नवीन संधी : गडकरी
भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पानुसार अर्थमंत्र्यांचा हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक क्षेत्रात वाढ करणारा आहे. उद्योग-व्यवसायात प्रगती होईल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारा आहे.
बजेटमध्ये केवळ अहंकार : हरसिमरत कौर
मला या बजेटमध्ये एक अहंकार दिसून येत होता. आम्ही जुलैमध्ये बजेट सादर करू असे त्यांनी म्हटले. त्यावरून तुम्ही कोणतीही निवडणूक हलक्यात घेणार नाही, असेच त्यांनी सांगितले आहे. आज तुमच्याजवळ संधी होती पण गेल्या १० वर्षात केलेले वायदे पूर्ण करावेत, केवळ जनतेला आणखी स्वप्न दाखवायचे काम काम करू नये, अशी टीका शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे.
जनतेची दिशाभूल : अधीर रंजन चौधरी
हा अर्थसंकल्प कोणत्याही धोरणात्मक निर्णयाचे संकेत देत नाही. सरकारने ज्या पद्धतीने अर्थसंकल्प मांडला आहे त्यावरून या सरकारचे धोरण स्पष्ट होते. हा अर्थसंकल्प रोजगार देणारा आहे का? याचे उत्तर नकारात्मक आहे. हा अर्थसंकल्प सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी आहे.
थाटामाटात चर्चा, ठोस काहीच नाही :शशी थरूर
अर्थमंत्र्यांचे आजचे भाषण हे आजवरील सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषणांपैकी एक आहे. यातून ठोस काहीही निष्पन्न झाले नाही. नेहमीप्रमाणे थाटामाटात चर्चा झाली. या अर्थसंकल्पातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पीएलआय योजनेच्या यश किंवा अपयशावर अर्थमंत्र्यांनी काहीही सांगितले नाही, ज्यामध्ये सरकारचा इतका पैसा खर्च होत आहे. त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला, पण त्यांना तथ्य सांगता आले नाही.