अर्थमंत्री निर्मला सीतारमण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर केला. आपल्या ५८ मिनिटांच्या भाषणात देशाची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. सर्व व्यवहारांत सरकारने पारदर्शकता आणली आहे. तसेच महागाई आहे मात्र ती माफक आहे. अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत असे त्या म्हणाल्या. या वर्षी लोकसभेची निवडणूक असल्याने आज सादर केलेले बजेट अंतरिम होते. संपूर्ण बजेट या वर्षीच्या जुलै महिन्यात सादर केले जाईल.
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षांत मोदी सरकारने (Modi Government) कोणत्या योजना आणल्या आणि कशी प्रगती साधली याची माहिती दिली. तसेच सबका साथ सबका विकास हा मोदी सरकारचा मंत्र आहे. नव्या रोजगार निर्मितीवर सरकारने भर दिला आहे. ८० कोटी लोकांना निशुल्क धान्य पुरवलं. ग्रामीण विकास, घर, पाणी, स्वयंपकाचा गॅस तसंच बँक खाती उघडण्यासाठी सरकारने वेगाने कार्य केले आहे. ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नांमध्ये चांगली भर पडल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच देशाच्या पायाभूत सेवांवर त्यांनी भाष्य केले.
कर रचनेत सध्या कोणतातही बदल केला गेला नाही. त्यामुळे प्राप्तिकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. अर्थमंत्री सीतारमण पुढे म्हणाल्या, प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. सध्या ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. परतावाही त्वरित दिला जातो. जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे.
२०४७ ला भारत भारत विकसित राष्ट्र
आपला देश आर्थिक सुधारणांवर भर देत पुढे जात आहे. मागील दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. गरीब, महिला आणि शेतकरी यांच्या प्रगतीला प्राथमिकता देत पंतप्रधान मोदी वाटचाल करत आहेत. त्यामुळे २०४७ ला भारत देश एक विकसित राष्ट्र असेल याबद्दल मुळीच शंका नाही.
सरकारने वास्तविक चार जातींवर लक्ष केंद्रित केले आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या गरजा आणि विकास या सरकारच्या प्राथमिकता आहेत. त्यांच्या विकासात देशाचा विकास दडला आहे. त्यांच्या कल्याणासाठी आम्ही काम करतो आहे.
अंतरिम बजेट २०२४ च्या अर्थमंत्री सीतारमण यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
जैवइंधनासाठी समर्पित योजना आणणार
सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनिक वाहने उपलब्ध करून देणार
रेल्वे - सागरी मार्ग जोडले जाणार
पर्यटन केंद्रांचा विकास करून पर्यटन विकासाला गती देणार
टियर २ आणि टियर ३ शहरे हवाई मार्गाने जोडली जाणार
लक्षद्वीपमध्ये नवीन प्रकल्प सुरू करणार
पायाभूत सुविधांवर ११ टक्के अधिक खर्च केला जाणार
प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे दिली जाणार
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार केला जाणार
तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणार
पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाणार
४० हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये जोडले जाणार
तसेच, लोकसंख्या वाढीबाबत समिती स्थापन करण्यात आली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.