नवरा-नवरीची भर मांडवात हाणामारी
#नवी दिल्ली
सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हीडीओ व्हायरल होत असतात. तर अनेक व्हीडीओ आपल्याला धक्का देणारे असतात. लग्नामध्ये नवरा-नवरीची हाणामारी झाल्याचे आपण कधी ऐकले आहे का? सध्या असाच एक व्हीडीओ व्हायरल झाला असून भर मांडवात नवरदेव आणि नवरी भांडण करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हीडीओत नवरा-नवरीच्या भांडणासाठी केळी कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. नवरदेव आपल्या बायकोला म्हणजेच नवरीला केळी खायला घालत असतो. केळाचे सालटे सोलून तिच्या तोंडापुढे त्याने नेले पण नवरी ते खाण्यास नकार देते. हे पाहून नवरदेवाला राग येतो आणि तो तिला बळजबरीने भरवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ती त्याचा विरोध करते आणि केळी खाली पडते. दरम्यान, केळी खाली पडल्याच्या रागातून नवरदेवाने नवरीला कानाखाली मारली. त्यानंतर नवरीनेही त्याच्या उलट कानाखाली मारली. याचा नवरदेवाला जास्तच राग आला आणि त्याने जास्तच मारायला सुरुवात केली. नवरीनेही चिडून पुन्हा त्याला मारल्यामुळे हे भांडण विकोपाला गेले. यानंतर "हे लग्न मोडले असेल" अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अर्थात खरोखरीच हे लग्न मोडले आहे का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. विवाह समारंभात परस्परांना केळी खाऊ घालण्याची प्रथा कशी काय, असा सवालही काहीजणांनी उपस्थित केला आहे.
वृत्तसंस्था