भाजप नेते लक्ष्मण सावदी काँग्रेसमध्ये दाखल
#बंगळुरू
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांचे नाव लक्ष्मण सावदी असे आहे. ते माजी उपमुख्यमंत्री असून शुक्रवारी त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांची भेट घेतल्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय जाहीर केला.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार यांची सिद्दरामय्या यांच्या बंगळुरूमधील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी लक्ष्मण सावदी यांनी भेट घेतली. १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण सावदी यांना बुधवारी उमेदवारी नाकारली होती. सावदी यांचा पक्षत्याग हा भाजपसाठी धक्का मानला जात असून काँग्रेस सावदी यांना उमेदवार देण्याची शक्यता आहे. भेटीनंतर शिवकुमार म्हणाले की, सावदी यांनी कोणत्याही अटीशिवाय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने अपमानित केल्याने सावदी यांनी भाजपचा त्याग केला आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करणे ही चांगली गोष्ट आहे.
भाजपमधील आणखी दहापेक्षा अधिक आमदार काँग्रेसमध्ये येण्यास तयार आहेत. मात्र, त्यांच्यासाठी आमच्याकडे जागा नाही. वृत्तसंस्था
सावदी हे प्रभावशाली लिंगायत नेते असून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे ते निष्ठावान सहकारी आहेत. तीन वेळा आमदार राहिलेल्या सावदी यांनी बुधवारीच आपल्या भाजप त्यागाचे संकेत दिले होते. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले नव्हते.
सावदी यांच्या पक्षत्यागाबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, सावदी यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय खेदजनक आहे. सावदी यांच्याशी माझे जवळचे संबंध होते. त्यांनी पक्ष सोडल्याचे व्यक्तिगत पातळीवर मला वाईट वाटते. राजकारणात कधी कधी अशी स्थिती येते. कदाचित सावदी यांना काँग्रेसमध्ये भवितव्य दिसत असेल.