संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाची कमान गेल्या ३० वर्षांपासून बादल कुटुंबाकडे आहे. आता बंडखोरी झाल्यास ती इतर नेत्याच्या हाती जाण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधात उघड बंडखोरी झाली आहे. अकाली दलाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी सुखबीर बादल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासाठी औपचारिक ठरावही मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत अकाली दलाची खराब कामगिरीमुळे त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. या लोकसभा निवडणुकीत अकाली दलाला केवळ एक जागा जिंकता आली आहे.
लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर अकाली दलात बंडखोरीची शक्यता आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते मनप्रीत सिंग अयाली यांनी निवडणूक निकालानंतर बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत पक्ष इक्बाल सिंग झुंडा समितीच्या शिफारशी लागू करत नाही तोपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. झुंडा समितीने पक्ष सुधारणेसाठी काही शिफारशी दिल्या होत्या पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही.
मंगळवारी (२५ जून) अकाली दलाच्या दोन बैठका झाल्या. एक जालंधरमध्ये अकाली दलाच्या बंडखोर नेत्यांची बैठक झाली आणि पक्षाच्या काही जिल्ह्यांचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित होते. तर दुसरी बैठक पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या अध्यक्षतेखाली चंदीगडमध्ये झाली. लोकसभा निवडणुकीतील अकाली दलाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली. जालंधरमध्ये झालेल्या बैठकीनंतर बंडखोर नेत्यांनी १ जुलैपासून शिरोमणी अकाली दल बचाओ आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. जालंधरच्या वडाळा गावात झालेल्या बंडखोर नेत्यांच्या या बैठकीत माजी खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा, माजी एसजीपीसी अध्यक्षा बीबी जागीर कौर, माजी मंत्री परमिंदर सिंह धिंडसा, माजी आमदार सिकंदर सिंह मलुका आणि सुरजितसिंग राखरा आदी बडे नेते उपस्थित होते.
पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून त्यागाची भावना दाखवावी आणि अकाली दलाला बळ देणाऱ्या आणि धर्म आणि राजकारण यांच्यातील समतोल राखणाऱ्या नेत्याकडे पक्षाची कमान सोपवावी, अशी मागणी बंडखोर नेत्यांनी केली. अकाली दलाच्या बंडखोर नेत्यांच्या बैठकीत संत समाजाशी संबंधित असलेल्या एका मोठ्या चेहऱ्याला पक्षप्रमुखपद देण्यावरही विचार करण्यात आला.