संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: अयोध्येत २२ जानेवारीला राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी केंद्रात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष देशभरातील वातावरण राममय व्हावे यासाठी झटून कामाला लागला आहे. यासाठी देशभरातील नेते, अभिनेते तसेच अनेक दिग्गजांना निमंत्रण पाठवले आहे. (Ayodhya)
या निमंत्रणावरून राजकारण होताना पाहायला मिळत आहे. यातच चारही शंकराचार्य २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते हिंदू धर्मातील नियमांकडे दुर्लक्ष करून हा कार्यक्रम होत असल्याने ते २२ जानेवारीला उपस्थित राहणार नाहीत.
उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, अयोध्येतील कार्यक्रम हा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. अविमुक्तेश्वरानंद हे त्यांचे गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये शंकराचार्य बनले.
पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे ‘शास्त्राविरुद्ध’ होणाऱ्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. चारही शंकराचार्य २२ जानेवारीच्या अयोध्येतील कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. आमच्या मनात कुणाच्याविषयी द्वेष नाही. मात्र हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांनाही तसे करण्यास सुचवणे, ही शंकराचार्य म्हणून आमची जबाबदारी आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात गुंतलेले लोक हिंदू धर्मातील नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
मंदिराचे बांधकाम पूर्ण न करता प्रभू रामाचा अभिषेक सोहळा आयोजित करणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वांचे पहिले उल्लंघन आहे. एवढी घाई करण्याची गरज नव्हती, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले.
२२ डिसेंबर १९४९ ला मध्यरात्री बाबरी मशिदीमध्ये रामाची मूर्ती ठेवली तेव्हा आणि आणि १९९२ मध्ये ढाचा पाडला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्या घटना उत्स्फूर्तपणे घडल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही शंकराचार्यांनी तेव्हा प्रश्न उपस्थित केले नाहीत. मात्र आज तशी परिस्थिती नाही. आमच्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर अभिषेक करण्यासाठी पुरेसा वेळ असल्याचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
अविमुक्तेश्वरानंद म्हणतात की, आम्ही यापुढे गप्प बसू शकत नाही. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करणे आणि देवाची मूर्ती बसवणे ही वाईट कल्पना आहे. ते (कार्यक्रमाचे आयोजक) आम्हाला मोदीविरोधी म्हणतील अशी शक्यता आहे. मात्र आम्ही मोदीविरोधी नाही, पण आम्ही आमच्या धर्मग्रंथांच्या विरोधात जाऊ शकत नाही.