तब्बल १३ हजार अवैध मदरशांना टाळे
#नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात अवैध मदरशांचा तपास करणाऱ्या नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. या अहवालात तब्बल १३ हजार मदरसे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातील जास्त करून मदरसे नेपाळच्या सीमेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे मदरसे अवैध असून यांनी आजवर एकदाही उत्पन्न आणि खर्च यांचा हिशोब सादर केला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
एसआयटीच्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेकडोंच्या संख्येने मदरसे आहेत. त्यातील अवैध मदरशांची संख्या तब्बल १३ हजार असल्याचा अहवाल एसआयटीने सादर केला आहे. त्यामुळे येत्या काळात या मदरशांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नेपाळ सीमेजवळ असलेल्या महारगंज, शरावस्ती आणि बहारिच या जिल्ह्यांमध्ये अवैध मदरशांची संख्या जास्त आहे. या जिल्ह्यांमध्ये पाचशेपेक्षा जास्त अवैध मदरसे असल्याचे एसआयटी अहवालात सांगण्यात आले आहे. इतर जिल्ह्यातील मदरशांची संख्याही मोठी आहे. या मदरशांच्या आर्थिक गणिताबाबत एसआयटीने शंका व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशातील अवैध मदरशांची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने आपला अहवाल सादर केला असून या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. मदरशांनी आपले उत्पन्न आणि खर्च यांचा हिशोब सादर केलेला नाही. एसआयटीने शंका व्यक्त केली आहे की, टेरर फंडिंगच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम मदरशांमध्ये वापरली जात आहे. मदरशांनी असा दावा केला आहे की, लोकांकडून मिळालेल्या देणगीच्या माध्यमातून मदरसे चालतात, पण मदरशांनी या संदर्भातील माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. असा दावा करण्यात आला आहे की, जास्त करून मदरशांना विदेशातून निधी मिळतो. देशविरोधातील कारवायांसाठी देशातील मदरशांचा वापर केला जात आहे. दरम्यान, योगी सरकार या मदरशांवर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.