राघव चढ्ढा, संजयसिंग यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांची धरपकड
#नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरणाच्या चौकशी संदर्भात सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हिस्टिगेशनने (सीबीआय) समन्स बजावल्याच्या निषेधार्थ निदर्शने करणारे आपचे नेते राघव चढ्ढा, संजयसिंग यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केजरीवाल यांच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या दीड हजारांहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी दिली.
केजरीवाल यांना समन्स बजावल्याच्या निषेधार्थ आपने निदर्शने केल्याने रविवारी राजधानी दिल्लीत सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले. सीबीआयच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणाऱ्यांत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीच्या मंत्री अतिशी, राघव चढ्ढा, संजयसिंग, सौरभ भारद्वाज यांचा समावेश होता.
दिल्लीच्या मंत्री अतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांच्या वाढत्या लोकप्रियतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भीती वाटत आहे. या एकमेव कारणामुळे आपच्या नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे. यामुळेच केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात अडकवून सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सीबीआयच्या दाव्यानुसार मद्य धोरणामुळे हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. मात्र, एवढे दिवस चौकशी करून त्यांना एक रुपयाची लाच घेतल्याचे सिद्ध करता आलेले नाही. सगळ्या देशाला केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कल्पना आहे.
मद्य धोरणाच्या चौकशीसाठी बजावलेल्या समन्सनुसार केजरीवाल रविवारी सकाळी सीबीआय कार्यालयात हजर झाले. आत जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, मी सर्व प्रश्नांना उत्तरे देणार आहे. भाजप नेते आता माझ्या अटकेची चर्चा करत आहेत. सीबीआयचे सारे सूत्रसंचालन भाजप करत आहे.
वृत्तसंस्था