आंध्र प्रदेशमधील विद्यार्थ्याची ओहिओत गोळ्या घालून हत्या
#हैदराबाद
पदव्युत्तर पदवी मिळण्यास केवळ एक दिवस बाकी असताना २५ वर्षींय तेलुगू विद्यार्थ्याची अमेरिकेतील ओहिओ राज्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना एका पेट्रोल पंपावर घडली. वीरा साईश असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने जेव्हा पंप लुटण्यास आलेल्यांना विरोध केला तेव्हा त्याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला.
साईशच्या कुटुंबीयांनीच ही माहिती आंध्र प्रदेशमधील इलुरू येथे दिली. कोलंबस येथील वेस्ट बोर्ड स्ट्रीट ऑफ फ्रँक्लिंटन येथे ही घटना घडली. पेट्रोल पंपावर वीरा अर्ध वेळ क्लार्क म्हणून काम करत होता. साईशच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार साईश काम करत असलेला पेट्रोल पंप लुटण्यासाठी काही लोक आले होते. त्यावेळी साईशने विरोध केला असता अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि पैसे घेऊन निघून गेले. साईशला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले.
साईशचे कुटुंबीय पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पालाकोले शहरातील असून सध्या ते इलुरू येथे स्थायिक आहेत. साईशचे वडील वीरा रामण्णा येथील सी. आर. रेड्डी कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांचे चार वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी साईश नोव्हेंबर २०२१ मध्ये ओहिओला गेला होता. साईश आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथील क्लार्कची नोकरी सोडणार होता. आंध्रच्या गृहमंत्री तानेती वनिथा यांनी साईशच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
वृत्तसंस्था