अमूल-नंदिनी वादात राजकारणाला उकळी!

आंतरराष्ट्रीय पातळीवर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या गुजरातमधील अमूलने चार दिवसांपूर्वी केलेल्या एका ट्विटने विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुजरातमधील अमूल आणि कर्नाटकातील नंदिनी या आघाडीच्या दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्डमध्ये आता राजकीय युद्ध सुरू झाले असून सत्तारूढ भारतीय जनता पक्षालाही या वादाचे चांगलेच चटके बसत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 10 Apr 2023
  • 12:59 pm
अमूल-नंदिनी वादात राजकारणाला उकळी!

अमूल-नंदिनी वादात राजकारणाला उकळी!

कर्नाटक बाजारपेठेत उतरण्याच्या अमूलच्या घोषणेने ‘गो बॅक अमूल’ आणि ‘सेव्ह नंदिनी’ हॅशटॅग

#नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या गुजरातमधील अमूलने चार दिवसांपूर्वी केलेल्या एका ट्विटने विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुजरातमधील अमूल आणि कर्नाटकातील नंदिनी या आघाडीच्या दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्डमध्ये आता राजकीय युद्ध सुरू झाले असून सत्तारूढ भारतीय जनता पक्षालाही या वादाचे चांगलेच चटके बसत आहेत.

बंगळुरूमध्ये अमूल आता दुधाची ऑनलाईन सेवा देणार असल्याची घोषणा चार दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या घोषणेचा आधार घेत काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या दोन पक्षांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आपल्या राज्याचा स्वत:चा असा नंदिनी ब्रॅण्ड मातीत घालण्याचा भाजपचा डाव आहे. गुजरातची आनंद मिल्क युनियन लिमिटेड (अमूल) आणि देशभर अस्तित्व असणाऱ्या नंदिनी ब्रॅण्ड चालवणाऱ्या कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ) चे विलीनिकरण करण्याचा डाव या मागे असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. एवढेच नव्हे तर गुजरात गृहराज्य असलेल्या सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांनी राज्यात सार्वमत घेण्याची मागणी केली आहे. दक्षिण भारतातील दुग्ध व्यवसायात अमूलला प्रवेश करण्याविषयी सार्वमत घ्यावे असे त्यांनी म्हटले आहे. अमूलने कर्नाटकच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केल्यापासून गो बॅक अमूल आणि सेव्ह नंदिनी हे हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहेत.      

कर्नाटकमधील हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने तर राज्यतील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी केवळ नंदिनीचे दूधच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी सर्व कन्नड भाषिकांनी अमूल दूध खरेदी करू नये अशी शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात की, कर्नाटक मिल्क फेडरेशन धुळीत मिसळण्याच्या प्रयत्नांना सर्व कन्नड भाषिकांनी एकमताने विरोध करावा.  कर्नाटक मिल्क फेडरेशनची स्थापना ही राज्यातील शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि कल्याणासाठी झाली होती. अमूलच्या खरेदीवर कन्नड भाषिकांनी बहिष्कार टाकावा.

मुळातच प्रतिकूल राजकीय वातावरणाने बॅक फूटवर असलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमूलवरून राजकारण करू नये असे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, नंदिनी हा राज्यातील आणि देशातील दुधाच्या बाजारपेठेतील एक नंबरचा ब्रॅण्ड असेल.नंदिनीची उत्पादने राज्यातच नव्हे तर देशभरात विकली जातात. स्पर्धात्मक बाजारपेठेत नंदिनी अमूलच्या सर्व उत्पादनांना मागे टाकेल, यासाठी सर्व ते प्रयत्न 

केले जातील. 

या वादावर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार म्हणाले की, नंदिनीची उत्पादने अमूलपेक्षा कैक पटीने चांगली असल्याने अमूलसारख्या ब्रॅण्डची आम्हाला काहीही गरज नाही. आम्हाला आमचे शेतकरी आणि आमचा दुधाच्या ब्रॅण्डचे संरक्षण करायचे आहे.  

जनता दल धर्मनिरपेक्षनेही या वादात उडी घेत नंदिनी ताब्यात घेण्याच्या अमूलच्या प्रयत्नाना तीव्र विरोध करण्याचे स्पष्ट केले आहे. अमूलची उत्पादने ऑनलाईन सेवेद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे नंदिनीची उत्पाने जगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड शेतकऱ्यांच्या, उत्पादकांच्या प्रयत्नांवर पाणी ओतण्यासारखे आहे. जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हा ‘वन नेशन, वन अमूल’ चा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, या प्रश्नी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि या प्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest