विरोधी पक्षांची आघाडी नव्या नावाने
# नवी दिल्ली
आगामी लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबतची दुसरी बैठक सोमवारपासून येथे सुरू झाली. ही बैठक दोन दिवस असून मंगळवारी या बैठकीतील चर्चेचा तपशील बाहेर येईल. किमान समान कार्यक्रम आणि एकास एक उमेदवार ठरविण्याचे सूत्र या बैठकीतून साध्य होईल अशी अपेक्षा आहे. या बैठीकीच्या माध्यमातून राजकीय पटलावर नवी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए नावाने ओळखली जात होती. आता आघाडीचे नाव बदलण्यात येण्याची शक्यता आहे. या बैठकीत तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचाही समावेश आहे. अनेक समविचारी पक्षांची आघाडी असलेली काँग्रेसप्रणित युपीए दोन वेळेला सत्तेवर आली होती. सन २००४ ते २०१४ या सलग १० वर्षांच्या कालावधीत या आघाडीची देशात सत्ता होती. युपीएच्या अध्यक्षपदी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या होत्या. साहजिक सोनिया गांधी यांचा युपीएला सत्तेत आणण्यात महत्वाची भूमिका राहिली होती.
आता गेल्या ९ वर्षांपासून देशात सत्तेत असलेल्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या सरकारची सत्ता आहे. या एनडीएला आणि पर्यायानं भाजपला रोखण्यासाठी आता विरोधकांची नवी आघाडी तयार होत आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस हा प्रमुख पक्ष असला तरी या आघाडीचं नाव बदलून नवे नाव ठेवण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, आम्ही एकटे याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. बैठकीत सर्वांनुमते यावर निर्णय घेतला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत भाजपविरोधी आघाडी करण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरवावा लागणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी राज्यस्तरीय जागा वाटपाचा फॉर्म्युलाही या बैठकीत ठरवला जाणार आहे.
त्याचबरोबर ईव्हीएम तसेच निवडणूक आयोगामध्ये काय बदल करायला हवेत या मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय प्रचार कार्यक्रम, आंदोलने अशा अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांकडून एकजूटीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमिवर बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधकांची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर विरोधी पक्षांचे नेते आता बंगळुरू येथे दोन दिवसांच्या बैठकीसाठी एकत्र येत आहेत. कर्नाटकातील बंगळुरू बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहीती आहे.