संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत फूट पडली आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार के. सुरेश यांच्या नामांकनाच्या प्रस्तावावर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून के. सुरेश यांना पुढे केले, पण आपला सल्ला न घेतल्याने टीएमसी काँग्रेसवर नाराज झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी उमेदवारीबाबत विधाने करण्यापूर्वी चर्चाही केली नाही. काँग्रेसने एकतर्फी निर्णय घेतला. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत २९ सदस्य आहेत आणि हा सभागृहात चौथा सर्वात मोठा पक्ष आहे.
सध्या लोकसभेत विरोधकांचे २३४ खासदार आहेत, तर एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांना २९३ सदस्यांचा पाठिंबा आहे. निवडणुकीत टीएमसीने नाराजी व्यक्त केली तर के. सुरेश यांना केवळ २०५ मते मिळतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून आता टीएमसीची मनधरणी सुरू आहे. यासाठी एका बड्या नेत्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी एकमत न झाल्याने आता निवडणूक घ्यावी लागणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी (२६ जून) मतदान होणार आहे. एनडीएकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांनी मंगळवारी अखेरच्या क्षणी अर्ज दाखल केला आहे.
एकमत न झाल्याने निवडणूक
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएने पुन्हा ओम बिर्ला यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केले. खरेतर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होत असते. परंतु आता प्रथमच विरोधकांनी देखील या पदासाठी आपल्या उमेदवाराला ( कॉंग्रेस खासदार के. सुरेश ) उभे करीत सरकारला आव्हान दिले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पदासाठी चुरस झाली असून एनडीएच्या पुढे आता ओम बिर्ला यांना निवडून आणण्याचे आव्हान असणार आहे. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. ३ जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी देखील नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २६२ खासदारांनी शपथ घेतली होती. मंगळवारी दुपारी ३ ते ४ दरम्यान राहुल गांधी, अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्यासह २७० खासदार लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. सोमवारी (२४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली होती. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ओम बिर्ला यांना पुन्हा एनडीएने संधी दिली आहे. गेल्या टर्ममध्ये देखील ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष झाले होते.
बिनविरोध निवड करण्याच्या वाटाघाटी फसल्या
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या बाजूने प्रस्तावावर एनडीएच्या नेत्यांनी आज स्वाक्षरी केली. सरकार आणि विरोधकांमध्ये स्पीकरबाबत एकमत झालेले नाही. एनडीए पाठोपाठ आज इंडिया आघाडीनेही सभापतिपदासाठी आपला उमेदवार उभा केला आहे. मल्लिकार्जुन खरगे हे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. कालपासून आजपर्यंत मी त्यांच्याशी तीन वेळा बोललो आहे, असे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावर हल्ला केला असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. हा हल्ला आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच आम्ही संविधान हातात धरून शपथ घेतली. आमचा संदेश जनतेपर्यंत पोहोचत असून भारताच्या संविधानाला कोणतीही शक्ती हात लावू शकत नाही आणि आम्ही तिचे रक्षण करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.