'ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध खटला चालवून शिक्षा व्हावी'
#नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, विनयभंग, पाठलाग आदींप्रकरणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
आरोपपत्रातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी सहा कुस्तीगिरांच्या तक्रारीच्या आधारे तपास करून ब्रिजभूषण खटला चालवण्यास आणि शिक्षा होण्यास पात्र आहेत, असे म्हटले आहे.
१५ जून रोजी दिल्ली पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र सादर केले असून त्यात ब्रिजभूषण आणि कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांचे नाव आरोपींमध्ये आहे. कोर्टाने ब्रिजभूषण आणि तोमर यांना १८ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
ब्रिजभूषण यांच्या विरोधात ७ साक्षीदार असून लैंगिक शोषणाच्या कथित ठिकाणी त्यांच्या उपस्थितीचे पुरावेही सापडले आहेत
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार ब्रिजभूषणविरोधातील पाठलाग किंवा वाट अडवण्याचा खटला २०१२ चा आहे. यामध्ये तक्रार करणाऱ्या महिला कुस्तीपटूने सांगितले की, एका स्पर्धेदरम्यान ब्रिजभूषण यांनी तिच्या आईशी बोलून तिला खोलीत बोलावले आणि तिला घट्ट मिठी मारली. महिला कुस्तीपटू घरी परतल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या बहाण्याने तिच्या आईच्या नंबरवर अनेक वेळा कॉल केले. कॉल टाळण्यासाठी त्यांचा फोन नंबरही बदलावा लागल्याचा दावा केला. मात्र, आरोप सिद्ध करणारे कोणतेही तांत्रिक पुरावे मिळालेले नाहीत.
ज्या ठिकाणी कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत, त्या ठिकाणी आरोपीच्या उपस्थितीचे पुरावे मिळाले आहेत.
कुस्तीपटूंनी पुरावा म्हणून ५ छायाचित्रे पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत. याशिवाय आणखी डिजिटल पुरावे दिले होते. आरोपपत्रात सुमारे २५ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ७ साक्षीदारांनी पीडित कुस्तीपटूंच्या आरोपांचे समर्थन केले आहे. न्यायालयाने अल्पवयीन कुस्तीपटू आणि तिच्या वडिलांनाही नोटीस बजावली आहे. वृत्तसंस्था