संग्रहित छायाचित्र
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (Communist Party of India (Marxist)) ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं गुरुवारी (12 सप्टेंबर) दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने मोठा निर्णय घेतला आहे. येचुरी यांचा मृतदेह नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला अभ्यास आणि संशोधनासाठी दान केला आहे. सीताराम येचुरी यांच्यावर 19 ऑगस्टपासून एम्समध्ये उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
एम्स रुग्णालयाने (AIIMS Delhi) यासंदर्भातील मेडिकल बुलेटिन जारी केले. सीताराम येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी न्युमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०५ वाजता त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह एम्स रुग्णालयाला अध्यापन आणि संशोधनासाठी दिला आहे, अशी माहिती या बुलेटीन मध्ये देण्यात आली आहे.