‘रागां’वर कारवाई केली, खुशबूवर करणार का ?
#नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचे मोदी आडनावासंदर्भात केलेले एक जुने ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटवरून काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे केंद्र सरकारने जी कारवाई राहुल गांधी यांच्यावर केली तेच धाडस भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्यावर कारवाई करून दाखवावे, असे आव्हान काँग्रेसने भाजपला दिले आहे. दरम्यान खुशबू सुंदर यांनी आपण ते ट्विट डिलिट करणार नसल्याचा खुलासा केला आहे.
२०१८ साली खुशबू सुंदर काँग्रेसमध्ये होत्या. त्यांनी काँग्रेस पक्षात असताना पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. इथे मोदी, तिथे मोदी, जिकडे बघावं तिकडे मोदी, पण मोदी म्हणजे नेमकं काय? प्रत्येक मोदी नावाच्या पूर्वी भ्रष्टाचार शब्द लिहिला जातो. मोदी म्हणजेच भ्रष्टाचार, असे ट्वीट खुशबू सुंदर यांनी केले होते. त्यांच्या या जुन्या ट्विटवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. सुंदर या काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मोदी आडनावाबद्दल ट्विट केले होते, आता त्या भाजपवासी झाल्या आहेत. राहुल गांधींप्रमाणेच आता खुशबू सुंदर यांच्यावरही कारवाई होणार का, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान देशभरातील सर्वच विरोधी पक्षांनी भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला आहे. विरोधी नेत्याला ईडी आणि सीबीआय कारवाईची भीती दाखवायची आणि त्याला भाजपमध्ये घ्यायचे. भाजपमध्ये गेला की त्याच्या विरोधात सुरू असलेली चौकशी बंद करायची. खुशबू सुंदर आता भाजपमध्ये गेल्या म्हणून त्यांचे वक्तव्य माफ केले जाणार का, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
काय म्हणाल्या खुशबू सुंदर?
मी पंतप्रधान मोदींसंदर्भात केलेले ट्वीट डिलिट करणार नाही. असे आणखी बरेच ट्वीट मी केले होते. मुळात काँग्रेसकडे आता काहीही कामी उरलेले नाही. काँग्रेस पक्षाने त्यांचा वेळ आता चांगल्या कामासाठी वापरावा. खरे तर काँग्रेस, मला आणि राहुल गांधींना सारखेच समजतात. त्यासाठी काँग्रेसचे आभार, अशी प्रतिक्रिया खुशबू सुंदर यांनी दिली. तसेच माझे पंतप्रधान मोदींबद्दल मतपरिवर्तन झाल्यानेच मी भाजपात प्रवेश केला होता, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, खुशबू सुंदर यांच्या व्हायरल ट्वीटरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. पंतप्रधान मोदी आता आपल्या मोदी नावाच्या शिष्याद्वारे खुशबू सुंदर यांच्यावर मानहानीचा दाखल करतील का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. वृत्तसंस्था