जयपूरमध्ये घडली दिल्लीमधील राजेंद्रनगरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती; पावसाचे पाणी तळघरात शिरून तिघांचा मृत्यू

राजस्थानची राजधानी जयपूरसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस चालू आहे. जयपूरमधील अनेक भागांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वेस्थानके, पोलीस स्थानके व रुग्णालयांमध्ये देखील पाणी शिरले आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये दिल्लीमधील जुन्या राजेंद्रनगरमध्ये झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 2 Aug 2024
  • 11:30 am
National News, Three people died after rainwater seeped into the basement, waterlogged settlements, Roads, airports, railway stations, police stations, heavy rain in india

संग्रहित छायाचित्र

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस चालू आहे. जयपूरमधील अनेक भागांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वेस्थानके, पोलीस स्थानके व रुग्णालयांमध्ये देखील पाणी शिरले आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये दिल्लीमधील जुन्या राजेंद्रनगरमध्ये झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. जयपूरमधील विश्वकर्मा भागात पावसाचे पाणी एका तळघरात शिरले.  या तळघरात चार वर्षांच्या चिमुरडीसह तीन जण अडकले होते. या तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून तळघरातील पाणी काढण्याचे काम सुरू केले आहे.

दिल्लीच्या जुन्या राजेंद्रनगर भागात एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले होते. अनेक विद्यार्थी या तळघरात अडकले होते. त्यापैकी दोन तरुणी व एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असतानाच जयपूरमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या तळघरातील पाणी काढण्याचे काम चालू आहे. मदत व पुनर्वसन विभागाचे कर्मचारी, बचाव पथक, अग्निशमन दल मिळून तळघरातील पाणी काढण्याचे काम करत आहेत. अद्याप एकही मृतदेह हाती लागलेला नाही. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची ओळख पटवता येईल असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. मुसळधार पावसामुळे जयपूरच्या अनेक भागांमध्ये घरे कोसळल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. राजधानीमधील जामडोली भागात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस आणि एक प्रवासी बस रस्ता खचल्याने अडकली आहे. या घटनेत कोणालाही मोठी इजा झालेली नाही. मात्र बस खड्ड्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.

केरळ व उत्तर भारतात पावसाचे थैमान

मुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक भागांमध्ये पूर आला आहे. वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. ही घटना ताजी असतानाच आता उत्तर भारतातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्येही अतिवृष्टी चालू आहे. केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर लिनचोलीजवळ ढगफुटीची घटना घडली आहे. त्यामुळे काहीच क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली आहे. ढग फुटल्याने ओढे, नाले तुडुंब भरून वाहताहेत. तसेच, केदारनाथला जाणारी पदयात्रा विस्कळीत झाली आहे. पदयात्रेच्या मार्गावरच ढग फुटल्याने ५० ते २०० तीर्थयात्रेकरू अडकल्याचं वृत्त समोर आले आहे.

Share this story

Latest