संग्रहित छायाचित्र
नवदाम्पत्य देवदर्शनानंतर सहलीसाठी गेले असताना पाच मद्यधुंद नराधमांनी नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना मध्य प्रदेशमधील रेवा येथे घडली आहे. सदर दाम्पत्य २१ ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून रेवा येथील एका मंदिरात देवदर्शनाला आले होते. त्यानंतर तेथूनच जवळ असलेल्या काही अंतरावरील एका पिकनिक स्पॉटवर हे दोघे भटकायला गेले होते.
रेवापासून दोन किलोमीटरवर असलेल्या पर्यटन केंद्रावर हे पाच आरोपी पार्टी करत होते. आरोपींनी अगोदर या नवविवाहित दाम्पत्याशी ओळख करून घेतली. त्यानंतर नवऱ्याला मारहाण करत पत्नीपासून दूर नेले. त्यानंतर मग सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती रेवाचे पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी दिली.
हे पाशवी कृत्य करताना या माथेफिरूंनी या नवविवाहितेचा व्हीडीओही बनवला आणि जर या प्रकाराची कुठे वाच्यता केली तर सदर व्हीडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिली. बदनामीच्या या धमकीमुळे पीडित दाम्पत्य पुढे यायला घाबरत होते. मात्र दुसर्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी या दांपत्याने पोलीस ठाण्यात येऊन एफआयआर दाखल केला.
दरम्यान आरोपी या घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होते. घटनास्थळावरून मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी हे रेवा जिल्ह्यातीलच असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पीडितेने आरोपींचे पोलिसांना केलेल्या वर्णनानुसार या पाच आरोपींच्या हातावर आणि छातीवर टॅटू होते. या माहितीचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पीडितेने सांगितल्याप्रमाणे घटनास्थळी चार ते पाच आरोपी होते. मात्र आमच्या तपासात त्याहून अधिक लोक या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय आहे. काही लोकांनी या आरोपींना
मदत केली होती, अशी शक्यता पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली. पाच अज्ञात आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.