राजस्थानमध्ये राजकीय भूकंप
#जयपूर
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय, माजी कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपप्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजप प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत राजधानी जयपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात या नेत्यांचा मेगा प्रवेश सोहळा पार पडला.
काँग्रेसच्या या नेत्यांसोबत त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते भाजपवासी झाले आहेत. राजस्थानच्या राजकारणात झालेल्या या भूकंपामुळे सगळी राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये नागौरचे अनेक दिग्गज जाट नेते आहेत. त्यामुळे भाजपने २५ पैकी २५ जागांवर विजयाचा दावा केला आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये लालचंद कटारिया यांच्यासह गहलोत सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजेंद्र यादव, माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, अलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, भीलवाडाचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. कटारिया हे जसे गहलोत यांचे निकटवर्तीय आहेत, तसेच खिलाडीलाल बैरवा हे सचिन पायलट यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवाय रामपाल शर्मा हे माजी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांचे अत्यंत जवळचे समजले जातात.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लालचंद कटारिया म्हणाले की, अंतरात्म्याच्या संकेतामुळे मी भाजपमध्ये सहभागी झालो आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला पुढे नेण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
भाजपमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये दोन माजी मंत्री, चार माजी आमदार सहभागी आहेत. अनेक राज्यांमध्ये भाजपकडून ऑपरेशन लोट्स राबवले जात आहे. महाराष्ट्र, बिहारनंतर हिमाचल प्रदेशमध्येही कुरापती सुरू आहेत. त्यातच रविवारी राजस्थानमध्ये राजकीय भूकंप झाला आहे.