संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: इस्कॉनने ९ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या ह्युस्टन येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचे आयोजन केले होते. या रथयात्रेवरून मोठा वाद सुरू झाला आहे. इस्कॉनवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असून जगन्नाथ मंदिर ट्रस्ट व गोवर्धन पीठाने भारतात इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इस्कॉनने ओडिशा सरकार व पुरीचे गजपती महाराज यांना नियोजित वेळेसह इतर वेळी रथयात्रा आयोजित केली जाणार नाही असे आश्वासन दिले होते. असे असताना अमेरिकेतील ह्युस्टन येथे इस्कॉनने भगवान जगन्नाथाची रथयात्रा आयोजित केली होती.
या यात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती देखील ठेवण्यात आल्या नव्हत्या. इस्कॉनच्या 'फेस्टिव्हल ऑफ ब्लिस'मध्ये हा प्रकार घडला. यानंतर ओडिशा सरकार आणि भाविकांनीही या कार्यक्रमावर टीका केली आहे. पुरीतील गोवर्धन पीठाचे प्रवक्ते मातृप्रसाद मिश्रा म्हणाले की, हा कार्यक्रम धर्मविरोधी आहे, त्यामुळे इस्कॉनवर भारतात बंदी घालावी. मिश्रा म्हणाले, ह्युस्टनमधील इस्कॉनने अनियोजित रथयात्रा आयोजित करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. ओडिशाचे कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन म्हणाले की, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन या प्रकरणी निर्णय घेईल. मात्र, मंदिर जो निर्णय घेईल, त्याला राज्य सरकार पाठिंबा देईल.
ह्युस्टन इस्कॉनच्या वतीने संकेतस्थळावर निवेदन देण्यात आले की, मंदिराने यापूर्वी मूर्तींसह रथयात्रा काढण्याचा विचार केला होता. मात्र, स्थानिकांनी या बाबत नाराजी व्यक्त केल्याने हा निर्णय बदलण्यात आला. उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना भगवान जगन्नाथाचे दर्शन घ्यायचे आहे. त्याचबरोबर परंपरेचा आदर करणेही गरजेचे आहे. इस्कॉन आणि पुरीच्या अधिकाऱ्यांमध्ये पुढील महिन्यात भारतात बैठक होणार असून जे काही एकमत होईल त्यानुसार काम केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. पारंपरिक दिनदर्शिका आणि भक्तांच्या इच्छा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन यातून मार्ग काढावा लागेल, असे इस्कॉनच्या निवेदनात म्हटले आहे. यावर काय निर्णय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.