‘आप’च्या प्रवेशाने कर्नाटकात चौरंगी लढत
#नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून तेथे एका टप्प्यात म्हणजे १० मे रोजी मतदान होणार आहे. १३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करताना लोकसभेच्या एका आणि चार राज्यांतील चार विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.
कर्नाटकमध्ये सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्यात सत्ताप्राप्तीसाठी मोठी चुरस असणार आहे. जातीयवादाचे राजकारण आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय जनता पक्षाला सत्ता टिकवणे हे मोठे आव्हान असणार आहे. बोम्मई यांच्या खालावलेल्या प्रतिमेची धास्ती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यांत सातत्याने कर्नाटकला सातत्याने भेटी दिल्या आहेत. ही निवडणूक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची कसोटी असणार आहे.
आम आदमी सर्व जागा लढवणार
दरम्यान,आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटकमध्ये सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्ली, पंजाब, गुजरात आणि त्यानंतर केजरीवाल कर्नाटकमध्ये सर्व जागा लढवणार असल्याने त्याचा कोणाला फायदा होणार याबाबतचे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. कर्नाटकात सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष आणि आम आदमी असे चार पक्ष निवडणूक रिंगणात असणार आहेत. या चौरंगी लढतीतून मतदार कोणाच्या हाती सत्ता सोपवितात ते १३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.
आम आदमी पक्ष कर्नाटकमध्ये निवडणूक लढवण्याची आधीपासून तयारी करत आहे. केजरीवाल यांना राज्यात संघटना बांधणीचे काम देखील केले आहे. काही ठिकाणी रॅली देखील काढली होती. आम आदमी पक्ष आता कर्नाटक निवडणूकीत भाजप आणि काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. आम आदमी ८० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केले नसून यात आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे.
निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करताना लोकसभेच्या एका आणि चार राज्यांतील चार विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. तेथेही १० मे रोजी मतदान होऊन १३ मे रोजी मतमोजणी होईल. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले जालंधर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे खासदार संतोक सिंग चौधरी(वय ७६) यांचे जानेवारीत हृदयविकाराने निधन झाल्याने येथे पोटनिवडणुक घ्यावी लागत आहे. ओडिशातील झारसुगुडा, उत्तर प्रदेशातील सुआर, चानबे, मेघालयातील सोहिआँग अशा चार विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे.
वायनाडची घाई नाही
या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द झाले असले तरी तेथे निवडणूक घ्यायची घाई करण्याची आवश्यकता नाही. तेथील न्यायालयाने राहुल गांधी यांना अपील करण्यासाठी महिन्याची मुदत दिली आहे. वायनाडमधील जागा रिकामी झाल्याची अधिसूचना २३ मे रोजी काढण्यात आली. कायद्यानुसार जागा रिक्त झाल्यावर सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. तसेच तेथे रिक्त होणारी जागा वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी खाली होणार असेल तर तेथे निवडणूक घेण्याची गरज नाही. वायनाडची जागा वर्षांपेक्षा अधिक काळासाठी रिकामी राहणार आहे. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सोमवार किंवा शुक्रवारी मतदान ठेवण्याऐवजी ते जाणीवपूर्वक बुधवारी ठेवले आहे. जोडून येणाऱ्या सुटीचा फायदा घेऊन मतदार मतदानाऐवजी गावाला बाहेर जातात. ते टाळण्यासाठी मतदान मध्येच ठेवले आहे. त्यामुळे मतदार मतदान केंद्रावर अधिक हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मे २०१८ मध्ये त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात आली होती. भाजपाला १०४, काँग्रेसला ८० आणि जनता दल धर्मनिरपेक्षला ३७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्षने एकत्र येऊन कुमारस्वामींच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकार स्थापन केले होते. अनेक आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने जुलै २०१९ मध्ये सरकार कोसळले. वृत्तसंस्था