भोंदूबाबासाठी १२१ जणांचे नाहक बळी, निलंबित पोलीस बनला भोलेबाबा
लखनौ : हाथरस येथील सत्संगाला क्षमतेपेक्षा जास्त लोक हजर होते. सत्संगानंतर भाविकांनी भोलेबाबाला पाहण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. या गर्दीत चेंगाराचेंगरी झाल्याचे आता समोर आले आहे. आयोजकाने ८० हजार लोकांची व्यवस्था केली होती. मात्र त्यापेक्षा जास्त संख्येने गर्दी झाली. दुर्घटनेनंतर हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न भोलेबाबा आणि त्याच्या आयोजकाने केले असल्याचाही प्रकार समोर आला आहे. आता या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. चेंगराचेंगरीला जबाबदार भोलेबाबांवर लैंगिक शोषणाचा आरोप, पोलिसांनी नोकरीवरुन काढल्याचीही माहिती समोर आली आहे. चेंगराचेंगरीला भोलेबाबा जबाबदार असून चेंगराचेंगरीत १२१ लोक मारले गेल्यानंतर भोलेबाबा उर्फ सूरजपाल फरार आहे. (hathras stampede)
मंगळवारी नेमके काय घडले?
मंगळवारी (२ जुलै) स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ भोले बाबा याने आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले होते. भोले बाबाने सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्याचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले. या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.
एफआयआरमध्ये काय म्हटले आहे ?
एफआयआरनुसार, आयोजकाने या कार्यक्रमात सुमारे ८० हजार भाविकांना एकत्र येण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या संस्थेने यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी लाखो भाविक जमले होते हे उघड केले नव्हते. तसेच मंगळवारच्या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतून आणि जवळपासच्या राज्यांतून सुमारे अडीच लाख लोक जमले होते. परवानगीच्या अटींचे पालन न केल्याने जीटी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञात आयोजक आणि स्वयंसेवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, उपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ भोले बाबा याच्यावर कारवाई केली जाईल, परंतु या प्रकरणात दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये त्याचे नाव नाही. दरम्यान, एफआयआरमध्ये भोले बाबाचे नाव नसल्याने मृतांच्या कुटुंबीयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोक बाबासाठी आले होते. त्यामुळे भोले बाबाला मुख्य आरोपी मानले पाहिजे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
स्वयंसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, तपासासाठी एसआयटी स्थापन
सत्संग संपल्यावर भोलेबाबा निघून जाऊ लागला. त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. मात्र स्वयंसेवकांनी भाविकांना अडवले. त्यामुळे स्वयंसेवकांना धक्काबुक्की झाली आणि त्यांनतर चेंगराचेंगरी सुरु झाल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले आहे. या सगळ्या स्वयंसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश योगींनी दिले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास समितीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. स्वयंसेवकांनी दुर्घटनेतील सत्य दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकरणाची न्यायालयीन चौकशी
हाथरस येथे झालेला प्रकार अपघात होता की षडयंत्र? हे तपासावे लागणार आहे. हे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराच्या मुळाशी कोण आहे याचा तपास न्यायालयीन समितीतर्फे केला जाणार आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, प्रशासनातील निवृत्त अधिकारी या समितीत असतील. या तपासानंतर एक आदर्श अशी नियमावलीची तयार करण्यात येणार आहे. याशिवाय या दुर्घटनेतील निष्काळजीपणाची जबाबदारी नेमकी कोणाची हेही स्पष्ट होणार आहे.
१६ जिल्ह्यांतील १२१ मृत्युमुखी
१२१ मृतांमध्ये १६ जिल्ह्यांतील नागरिकांचा समावेश असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मध्यप्रदेश, हरियाणा आणि राजस्थानातील ६ भाविकांचाही मृतांत समावेश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच विविधी रुग्णालयांत जाऊन जखमींवरील उपचारांची पाहणी केली आहे. राज्य सरकारचे तीन मंत्री मुख्य सचिवांसह १० उच्चाधिकारी या सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत.
भोलेबाबाची स्वतःची सुरक्षा यंत्रणा- नारायणी सेना !
चाहत्यांची संख्या वाढल्यावर सुरजपाल उर्फ भोलेबाबाने स्वतःची सुरक्षा यंत्रणा उभारली. तिला नारायणी सेना असे नाव दिले. महिला आणि पुरुष सुरक्षारक्षकांची एक फळी उभारली. भोलेबाबा आणि त्याची पत्नी यांची सुरक्षा हेच या नारायणी सेनेचे मुख्य काम आहे. भोलेबाबाच्या सत्संगाचे नियोजन त्याचे स्वयंसेवक करत असतात. भोलेबाबा सतसंगाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी त्याचे सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी पोहचतात. त्याच्या शिष्यगणांत बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. सुट्टीच्या दिवशी पोलीस कर्मचारी त्याच्या सेवेत असतात. मंगळवारी भोलेबाबाच्या वाहनाचा ताफा जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता तयार करण्यात आला होता.
भोलेबाबा नेमका कोण आणि कुठला?
नारायण सरकार विश्वास हरि उर्फ भोलेबाबा याचे खरे नाव सूरजपाल सिंह आहे. कासगंज जिल्ह्यातल्या बहादूर नगर हे त्याचे मूळ गाव आहे. सूरजपाल सिंह याचे दोन भाऊ होते. त्याच्या मोठ्या भावाचे निधन झाले आहे. तर त्याचा लहान भाऊ बहादूरनगर गावात राहतो आणि शेती करतो. सूरज पाल सिंह उत्तर प्रदेश [पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. सुरजपालची पत्नी त्याच्यासोबतच राहते. त्यांना मुलबाळ नाही. नोकरीतून निलंबित झाल्यावर सुरजपाल गावात आला, त्याने ट्रस्ट स्थापन केला. सत्संग सुरु करून त्याने पैसे कमावले. आग्रा, अलिगढ आणि राजस्थानात त्याचे आश्रम आहेत. आग्रा येथे एका मुलीचा मृत्यू झाला असताना तिला जिवंत करतो , असा दावा केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. उत्तर प्रदेश पूर्वचे पोलीस महासंचालक प्रकाश सिंह यांनी सांगितले की, सूरजपाल सिंह उर्फ भोलेबाबाला उत्तर प्रदेश पोलिसांनी नोकरीवरुन काढून टाकले होते. कारण सूरजपालविरोधात पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. त्यात लैंगिक शोषणाचा गुन्हाही आहे. सूरजपाल सिंह याचा सगळा इतिहास प्रकाश सिंह यांना ठाऊक आहे. सूरजपाल सिंह यांनी १९९० च्या दशकात नोकरी सोडली असे सांगितले जाते. मात्र त्याला पोलिसांनी काढून टाकले होते, असे प्रकाश सिंह यांनी म्हटले आहे. नोकरी गमावल्यानंतर तो सत्संग करु लागला. भोलेबाबा हे त्याचे नाव पडले. त्याच्या पत्नीला लोक मातोश्री म्हणतात. सूरजपालने ३० एकर जमिनीवर आपला आश्रम स्थापन केला. या आश्रमात अनेक लोक येत असतात. काही लोक या ठिकाणी वास्तव्यासही असतात. त्याने आपली संपत्ती ट्रस्टच्या नावे केली होती. या संपत्तीची देखरेख त्याचा एक मॅनेजर करतो.
पीडितांचा प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा !
हाथरस दुर्घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जे सांगितले ती कहाणी काळीज पिळवटून टाकणारी आहे. या अपघातात कोणाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, तर काहींच्या कुटुंबातील लोकांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. मंगळवारची परिस्थिती अशी होती की, लोक मृतदेहांमध्ये पडलेल्या लोकांचे श्वास तपासत होते, अजूनही श्वास घेत आहेत का आणि त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांचे प्राण वाचवता येतील का, असे चित्र पाहायला मिळाले.
'मी तिला अनेकदा संत्संगाला जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या पत्नीने ऐकले नाही. जर तिने ऐकले असते तर...' पत्नीबद्दल बोलताना मेहताब यांचा कंठ दाटून आला होता. पाणावलेल्या डोळ्यांनी मेहताब त्यांच्या पत्नी गुड़िया देवीबद्दल सांगत होते. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत गुड़िया देवी मृत पावल्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या २ महिलांचा देखील मृत्यू झाला आहे. हाथरसच्या चेंगराचेंगरीमध्ये पत्नी, आई आणि १६ वर्षांची मुलगी गमावलेले विनोद मोठ्या धक्क्यात आहेत. विनोद म्हणाले की, मी या अपघातात सर्वस्व गमावले आहे. या तिघीही सत्संगाला गेल्याचे मला माहीती नव्हते. सत्संगात चेंगराचेंगरी झाल्याचे समजताच मी घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी मला समजले की, या चेंगराचेंगरीत मुलगी, आई आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अजूनही माझ्या आईचा मृतदेहही सापडला नसल्याचे विनोद म्हणालेत. मुलगी रोशनीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, हाथरस घटनेतील १६ वर्षीय मुलीच्या पीडितेच्या आई कमला म्हणाल्या, 'मी २० वर्षांपासून बाबांच्या सत्संगाला जाते. यावेळी मी आपल्या १६ वर्षांच्या मुलीसोबत आले होते. दुपारी दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. मला आणि माझ्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. आम्ही ठीक होतो पण रुग्णालयात पोहोचताच माझी मुलगी बेशुद्ध पडली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.