पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे ११ बळी
#कोलकाता
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी झालेले मतदान हिंसाचार, मारामाऱ्या, बूथ लुटणे, मतपत्रिका फाडणे, मतपत्रिका जाळणे अशा घटनांनी गाजले आहे. शुक्रवार रात्रीपासून राज्यातील हिंसक घटनांत ११ जणांनाआपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय दल तैनात केल्यावरही वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. कूचबिहारच्या मठभंगा-१ ब्लॉकच्या हजरहत गावात एक तरुण मतपेटीच घेऊन पळून गेला. एका ठिकाणी मतपेट्यांमध्ये पाणी टाकल्याचे आढळले
पूर्वी बर्दवान जिल्ह्यामध्ये बरविटा प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर काही समाजकंटकांनी तोडफोड केली. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बॅलेट बॉक्समध्ये पाणी टाकले.
भारतीय सेक्युलर फ्रंट आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दक्षिण २४ परगणामधील भागड ब्लॉकमधील जमीरगाची येथे संघर्ष झाला. तृणमूलच्या लोकांनी पिशवीत बॉम्ब भरून आणले होते. त्यांचे कार्यकर्ते गावातील लोकांना धमकावून मते मिळवत होते. त्यांनी इतके बॉम्ब फेकले की दोन तास मतदान थांबले. काही बॉम्ब पत्रकारांच्या दिशेनेही फेकले. सध्या येथे केंद्रीय दल तैनात आहे.
निवडणूक हिंसाचारात गेल्या २४ तासांत अकराजणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच तृणमूल कार्यकर्ते, एक काँग्रेस कार्यकर्ता, एक माकप कार्यकर्ता, दोन उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींचा समावेश आहे. ९ जूनपासून झालेल्या हिंसक घटनांमध्ये मृतांची संख्या २७ वर गेली आहे. राज्यात एकूण ७३ हजार ८८७ ग्रामपंचायतींपैकी ६४ हजार ८७४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यापैकी ९ हजार १३ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेले सर्वाधिक ८,८७४ उमेदवार तृणमूल काँग्रेसचे आहेत. भाजपचे ६३, काँग्रेसचे ४० आणि सीपीएमचे ३६ उमेदवार बिनविरोध निवडून आले
२०१८ च्या पंचायत निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर ५८, ६९२ जागांपैकी २०, ०७८ म्हणजेच ३४.२ टक्के जागा बिनविरोध झाल्या होत्या. यातील जवळपास सर्वच जागा तृणमूलने जिंकल्या होत्या. बंगालमधील पंचायत निवडणुकांचे वेळापत्रक ८ जून रोजी जाहीर करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जून होती. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामांकनात सत्ताधारी तृणमूल आघाडीवर होती. राज्य निवडणूक आयोगाच्या मते, तृणमूलचे सर्वाधिक ६१,५९१ उमेदवार आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. त्यांनी ३८, ४७५ उमेदवार उभे केले आहेत. माकपने ३५, ४११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र, ग्रामपंचायतींच्या उमेदवारांच्या बाबतीत काँग्रेस अपक्ष उमेदवारांपेक्षाही मागे पडली आहे. १६, ३३५ अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसकडून केवळ ११, ७७४ अर्ज दाखल झाले आहेत. बंगालमधील काही जागांवर काँग्रेस-सीपीएमने एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केलेले नाहीत. त्याचप्रमाणे, आम आदमी पक्षानेही या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केलेला नाही.
उत्तर २४ परगणा येथील मिनाखान कुमारजोल ग्रामपंचायतीचे तृणमूलचे उमेदवार मेहरुद्दीन हे ४ जूनपासून हजला गेले होते. ते १६ जुलै रोजी परतणार आहेत. मात्र, परदेशात असूनही येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावर सीपीएमने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे आयोगाने नामांकन फेटाळले. नामनिर्देशन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याचे आयोगाने निदर्शनास आणून दिले. पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे.
वृत्तसंस्था